खोटे कधी बोलू नये, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे, पण नेहमी खरे बोलावे असा याचा अर्थ नाही. उलट, खरे केव्हा बोलावे याचेही काही धडे आपल्या संस्कृतीने आपल्याला घालून दिले आहेत. दुसऱ्याला बरे वाटेल असे असेल, तरच खरे बोलावे, अशी संस्कृतीचीच शिकवण आहे. सध्या सगळीकडे खोटे बोलण्याचाच जमाना बोकाळलेला असल्याने, खरे बोलणाऱ्यांची घुसमट सुरू असताना, संस्कृतीची ही शिकवण अशा लोकांसाठी दिलासादायक ठरणारी आहे. ‘सत्यं ब्रूयात, प्रियं ब्रूयात, न ब्रूयात प्रियमप्रियम’ ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. ज्यामुळे बरे वाटणार नाही, ते खरे असले तरी बोलू नये, असा या वचनाचा अर्थ.. त्यामुळे खोटय़ाच्या जमान्यात या वचनाचे पालन केले तरी खरे बोलणाऱ्यांना बरे वाटेल. खरी गोष्ट किंवा असह्य वास्तव पचविण्यास ज्याला जड जाते, त्याला दुखावणे हीदेखील ‘मानसिक हिंसा’च असते. आणि अिहसा हा तर आपला ‘परमधर्म’ आहे, त्यामुळे ‘अप्रिय सत्य’ न बोलणे हे दोन्ही दृष्टींनी पोषक असते. सध्या निवडणुकीचे वारे वाहात आहेत. अशा वादळात चारही बाजूंनी खऱ्याखोटय़ाचा मारा सुरू असताना त्यातून नेमके खरे बाजूला काढणे ही एक संभ्रमावस्थाच असते. आणि खरेपणा हे कडवटपणालादेखील निमित्त होत असते. सर्वसामान्य मतदाराला मात्र कोणत्या पक्षाच्या दिशेने निवडणुकीचे वारे वाहात आहेत, याची प्रचंड उत्सुकता असते. याचा फायदा उठवत राजकीय मंडळी या वाऱ्यांतच काही ‘मतलबी वारे’ सोडून देतात आणि पुन्हा खरेखोटय़ाचा संघर्ष सुरू होतो. अनेकदा खऱ्या गोष्टीदेखील खोटय़ा वाटाव्यात आणि खोटय़ालाच खरेपणाचा बेमालूम मुलामा चढावा, अशी परिस्थिती निर्माण होते आणि हे वारे न्याहाळणाऱ्या सामान्य मतदाराचा गोंधळ वाढतो. निवडणूकपूर्व मतदान चाचण्या हा त्यातलाच एक प्रकार. या चाचण्यांतून जेव्हा ‘मतलबी वारे’ वाहू लागतात, तेव्हा ते संबंधितांना सुखावतच असतात. पण त्यातले खरे, बरे वाटेल असे नसेल, तर ते जीवघेणे भासू लागते. निवडणूकपूर्व मतदान चाचण्यांचे निष्कर्ष तंतोतंत नि:पक्षपाती असतात, यावर गेल्या काही वर्षांच्या अनुभवांती आता शंभर टक्के मतदारांचा विश्वास राहिलेला नाही हे खरे असले तरी या निष्कर्षांमुळे काहींना बरे वाटते हेही खरे असते. गेल्या पंधरवडय़ापर्यंत अशा चाचण्यांच्या निष्कर्षांचे काँग्रेसला फारसे दुखणे नव्हते, पण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होणार आणि काँग्रेसची पीछेहाट होणार असे निष्कर्ष जारी होऊ लागले आणि या निष्कर्षांबद्दल काँग्रेसची कुरबुर सुरू झाली. हे म्हणजे, एका गोष्टीचा दुसऱ्याशी बादरायण संबंध जोडण्याचा प्रकार झाला, असेही एखाद्याला वाटू शकेल, पण अशा चाचण्यांचे निष्कर्ष ही काँग्रेससाठी ‘न ब्रूयात सत्यमप्रियम’ अशी स्थिती करणारी बाब ठरू पाहते आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही. भाजप आणि काँग्रेस हे आगामी निवडणुकीतील परस्परांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसणार हे निष्कर्ष खरे की खोटे यावर दुमत असू शकते, पण भाजपसाठी मात्र ते ‘प्रियं ब्रूयात’ असे ठरू पाहात आहेत. आजवरच्या पाहणी चाचण्यांमध्ये भाजपला असा दिलासा फार क्वचितच मिळाला असल्याने, मतदानपूर्व चाचण्यांच्या निष्कर्षांबाबत भाजपची तक्रार असण्याचे कारणच नव्हते. आता मात्र चाचणी निष्कर्षांचे हे वारे काँग्रेसला कळा आणि भाजपला गुदगुल्या करू लागले असतील..
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2013 रोजी प्रकाशित
न ब्रूयात प्रियमप्रियम..
खोटे कधी बोलू नये, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे, पण नेहमी खरे बोलावे असा याचा अर्थ नाही. उलट, खरे केव्हा बोलावे याचेही काही धडे आपल्या
First published on: 04-11-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Politicians creates atmosphere before election