scorecardresearch

अग्रलेख : ‘देव’दंभ!

अर्थव्यवहारांस डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत विस्तारणाऱ्या ‘फिनटेक’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रातील ही नावाजलेली कंपनी.

अग्रलेख : ‘देव’दंभ!
एक्सप्रेस फोटो

उत्पादक उद्योगांपेक्षाही सेवाक्षेत्रातील अ‍ॅप-आधारित ‘युनिकॉर्न’ कंपन्यांचे कौतुक करणे अनाठायीच ठरते, हे वारंवार दिसत राहिलेले आहे..

एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस ‘डॉट कॉम’चा फुगा असाच फुटला होता. धोरणकर्त्यांनी तरी अशा फुग्यांपासून लांब राहावे..

आधुनिक आर्थिक व्यवहारात अत्यंत महत्त्वाच्या, देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजार ‘नॅशनल स्टॉक एक्स्चेंज’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी हिमालयातील कोणा बोगस बाबाच्या सल्ल्याने महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेत असल्याचे निष्पन्न होते आणि ‘भारतपे’ या कथित आश्वासक, उगवत्या कंपनीचा प्रवर्तक कंपनीला गाळात घातल्यानंतर मालकी सोडण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची मागणी करतो, हे आजचे आपले आर्थिक वास्तव. ते जितके उद्विग्न करणारे आहे तितकेच ते चिंताही वाढवणारे आहे. उद्विग्न करणारे, कारण या अशांच्या हाती आपल्या गुंतवणुकीच्या चाव्या आहेत म्हणून आणि व्यवस्था सुधारणांशिवाय या असल्यांना सर्वोच्च पातळीवर उत्तेजन दिले जाते म्हणून चिंता. हिमालयवासी बाबाच्या सल्ल्याने आर्थिक निर्णय घेणाऱ्या ‘एनएसई’च्या चित्रा रामकृष्ण यांच्याविषयी नंतर. तूर्त ‘भारतपे’विषयी.

अर्थव्यवहारांस डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देत विस्तारणाऱ्या ‘फिनटेक’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या क्षेत्रातील ही नावाजलेली कंपनी. त्यात युनिकॉर्न. सुमारे १०० कोटी डॉलर्सपेक्षा अधिक मूल्य असलेली कंपनी ‘युनिकॉर्न’ गणली जाते आणि तिच्या कौतुकासाठी बाजारात गुंतवणूकदारांपासून माध्यमांपर्यंत सर्व ढोल बडवतात. या अशा ‘युनिकॉर्न’हाती जणू उद्याचे आपले भवितव्य असे मानले जाते. गूगल, अ‍ॅमेझॉन वा आजच्या तत्सम महाकंपन्या कालच्या युनिकॉर्न. त्यामुळे आजची प्रत्येक युनिकॉर्न उद्याची अशी महाकंपनी मानून तीस डोक्यावर घेतले जाते. ही नवी फॅशन. पण ते किती धोक्याचे आहे हे ‘भारतपे’च्या उदाहरणावरून लक्षात येईल.

‘भारतपे’चा जन्म अवघ्या चार वर्षांपूर्वीचा. शाश्वत नक्रानी आणि अश्नीर ग्रोवर या तरुण उद्योजकांनी २०१८ साली ती स्थापन केली. डिजिटल पेमेंट हे उद्योगक्षेत्र. यातील नक्रानी हा अ‍ॅप बनवणारा तर ग्रोवर महाशय हे नवउद्योजक मार्गदर्शक. आपल्या अन्य अनेक कार्यक्रमांप्रमाणे परदेशी कार्यक्रमाची नक्कल करणाऱ्या खासगी दूरचित्रवाणीवरील ‘शार्क टँक इंडिया’ या कार्यक्रमाचे हा गृहस्थ म्हणे आकर्षण. ‘आज’ ज्यास स्वत:चे सांभाळता येत नाही ते ‘उद्या’स काय मार्गदर्शन करणार हादेखील प्रश्नच. अवघ्या दोन वर्षांत ‘टायगर ग्लोबल’ या अमेरिकी गुंतवणूक आस्थापनाने तीत ३७ कोटी डॉलर्स गुंतवले आणि या कंपनीचे मूल्यांकन २८५ कोटी डॉलर्स असेल असा निर्वाळा दिला गेला. वास्तविक हे सारेच अतक्र्य आहे. कोणताही महसूल दिसत नसताना या कंपन्यांत इतकी गुंतवणूक होते कशी आणि भविष्यात या कंपन्यांचे मूल्य इतके भव्यदिव्य असेल हे या मंडळींना कळते कसे, हा प्रश्न शहाण्यांस पडू नये असे हे वातावरण. अशा अनेक प्रकरणांत या कंपन्यांचा समभाग हाताळणाऱ्या आणि त्यांचे मूल्यांकन करणाऱ्या कंपन्यांचे साटेलोटे असते. म्हणजे खासगी शिकवणी घेणाराच परीक्षा प्रश्नपत्रिका सिद्ध करणारा असावा आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणांची बेगमी त्याने करावी, असेच हे. पण ते तसे असण्यातच सर्वाचे हित असल्याने बोंब तरी कोण कोणाविरोधात ठोकणार, हा प्रश्नच. एकदा का फुगे फुगवायची आणि त्या उडत्या फुग्यांतच आनंद मानायची सवय झाली की फुगे कसे फुटणार नाहीत याची काळजी घेण्यातच सर्वाचे हितसंबंध असतात. ‘भारतपे’ हे त्याचे उदाहरण.

गेल्या वर्षी या ग्रोवरनामे सद्गृहस्थाने कोटक मिहद्रा बँकेच्या अधिकाऱ्यांस दरडावल्याचे प्रसिद्ध झाले आणि एकच खळबळ उडाली. दरडावणी कशासाठी? तर आश्वासन दिल्याप्रमाणे ‘नायका’ कंपनीचे समभाग ‘भारतपे’स मिळाले नाहीत म्हणून. मुळात नायकाचे समभाग मिळवून देण्याचे आश्वासन ‘कोटक मिहद्रा बँक’ का देते, हा वेगळाच प्रश्न. हे प्रकरण खूपच गाजल्यावर हे ग्रोवर रजेवर गेले. दरम्यान ‘भारतपे’च्या ‘वस्तू/सेवा कर’ देयकातील घोटाळय़ाचे एक नवेच प्रकरण पुढे आले. जनतेस डिजिटल पेमेंटचा प्रामाणिक वगैरे मार्ग दाखवणाऱ्या या कंपनीने मोठय़ा प्रमाणावर स्वत:च हा कर न भरल्याचे आढळले. ‘भारतपे’ने मुकाटपणे त्यातील काही रक्कम भरली आणि प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. ते मिटले नाही कारण हा पैसे भरून मिटवण्याचे प्रयत्न करणारा अधिकारी ग्रोवरचा मेहुणा असल्याचे आढळले. आणखी फाटक्यात पाय म्हणजे या अश्नीरच्या पत्नीचे उद्योग. या ग्रोवरबाई वास्तविक कंपनीच्या वरिष्ठ. पण कंपनीत नव्या नेमणुकांसाठी त्यांच्या खासगी सल्लागार संस्थेस घबाड दिले जात असल्याचे दिसून आले. म्हणजे या कंपनीत चाकरी हवी असेल तर या बाईंच्या

संस्थेमार्फत ती दिली जायची. यातील लबाडी एवढय़ापुरतीच मर्यादित नाही. तर झाले असे की या बाईंच्या संस्थेस नेमणूक सल्ल्याचा मोबदला दिला गेला. पण ज्यांची नेमणूक झाली त्यांना या संस्थेचे नावही माहीत नव्हते. याचा अर्थ सर्व काही कागदोपत्रीच. पण मोबदला मात्र खरा. अशा तऱ्हेने या ‘भारतपे’च्या गैरव्यवहारांची लक्तरे इतक्या प्रमाणात चव्हाटय़ावर येऊ लागल्यानंतर तटस्थ यंत्रणेमार्फत हिशेब तपासणीची आवश्यकता सर्व संबंधितांस लक्षात आली. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरील दोन यंत्रणा या कंपनीच्या उद्योगाची छाननी करीत आहेत. दरम्यान या ग्रोवर महाशयांस दीर्घ मुदतीच्या रजेवर पाठवण्यात आले असून त्यांनी ही कंपनी सोडावी असे प्रयत्न सुरू आहेत. या कंपनीत त्यांची मालकी आहे जेमतेम ९ टक्के. ‘ही मालकीही मी सोडतो पण चार हजार कोटी रु. टाका’ अशी त्यांची मागणी. हे भयंकर आहे. 

या आपल्या ‘उद्या’च्या कंपनीचे दशावतार समोर येत असताना सोमवारी भांडवली बाजारात अशाच काही ‘उद्या’च्या कंपन्यांचे काय झाले हे पाहणे उद्बोधक ठरावे. ‘पेटीएम’ ही अशीच आपली भाग्यविधाती. मोठय़ा तोटय़ात. पण तरी भांडवली बाजारात तिच्या समभागाचे मूल्य ‘ठरवले’ गेले २१५० रुपये. आज तो समभाग ८६२ रुपयांत मिळतो. ‘नायका’, ‘झोमॅटो’ आदी कंपन्यांची परिस्थिती ‘पेटीएम’पेक्षा बरी म्हणायची. म्हणजे समभाग ज्या किमतीस खुले केले गेले त्या आसपास त्यांचा दर आहे. पण गुंतवणुकीवर नफा वगैरे अद्याप मैलोगणती दूरच. या तिघांचे दाखले दिले कारण हे असेच एकेकाळचे ‘युनिकॉर्न’ म्हणून डोक्यावर घेतले गेलेले. ‘भारतपे’ भांडवली बाजारात यायच्या आधीच असा उघडा पडला. हे बाजारात आल्यानंतर. तरीही आपल्या नेतृत्वाचा सर्वोच्च भर आहे तो ‘युनिकॉर्न’चे गोडवे गाण्यावर.

ते जरूर गा. त्याविषयी ‘लोकसत्ता’स असूया असण्याचे काहीच कारण नाही. पण त्यांना डोक्यावर घेण्याच्या नादात पारंपरिक, अभियांत्रिकी, कारखानदारी उद्योगाकडे दुर्लक्ष का हा यातील महत्त्वाचा मुद्दा. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस ‘डॉट कॉम’चा फुगा असाच फुग(व)ला गेला होता. पुढे त्याचे काय झाले हे सर्वानी पाहिलेच. केवळ सेवाक्षेत्र, हे असले आभासी उद्योग हे कारखानदारी, शेती यास पर्याय असूच शकत नाहीत. या क्षेत्रांकडे दुर्लक्ष करायचे आणि या असल्या टिनपाटांच्या जिवावर भविष्याची स्वप्ने पाहायची हा अर्धवटपणा झाला. तो सटोडियांस शोभतो. धोरणकर्त्यांस नाही.

या ग्रोवर यांचे आणि काही यशस्वींचे असे का होते? त्याचे उत्तर त्यांना होणाऱ्या ‘देवदंभ’ (गॉड्स सिंड्रोम) या विकाराच्या बाधेत आहे. थोडय़ा अवधीत असे भरघोस यश मिळाले की सदर व्यक्ती स्वत:स सर्वेसर्वा मानू लागते. असे झाले की कपाळमोक्ष अटळ. तो ‘भारतपे’चा होण्यात अजिबात दु:ख नाही. पण तो धोरणकर्त्यांसही ग्रासत असेल तर काळजी वाटायला हवी. म्हणून अशा फुग्यांतील ‘देवदंभ’ फोडणे गरजेचे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-02-2022 at 00:59 IST

संबंधित बातम्या