आपला स्वार्थ जिथं गुंतला असतो तिथंच आपला ‘आपलेपणा’ असतो. जिथं स्वार्थपूर्तीला बाधा येते तिथं रक्ताच्या नात्यांतही ताण येतो! तेव्हा आपण खरं तर पूर्णपणे जगातही कुणाचेच कायमचे नसतो, हे वास्तव आहे. आपण आपल्या मनाच्याच ओढींचे असतो. या जगात ज्यांच्या ज्यांच्या आधारानं या ओढीला पुष्टी मिळते किंवा मिळेल असं आपल्याला वाटतं त्यांना आपण आपलं मानत असतो. आता काही रक्ताच्या किंवा मानलेल्या नात्यांत प्रेमभाव नसतो का? तर जरूर असतो, पण तिथं स्वार्थाची किनार अगदी सुप्तपणे असतेच. ती आपल्याला जाणवतही नाही. तुम्हाला ज्यांच्या ज्यांच्याबद्दल ‘प्रेम’ वाटतं, ते का वाटतं याची थोडी खोलवर तपासणी करा. मग लक्षात येईल की, आपल्याला जीवनात ज्या गोष्टीची कमतरता, अपुरेपणा किंवा उणीव भासते तिची पूर्ती ज्या व्यक्तीच्या आधारावर होईल, असं आपल्याला वाटतं ती व्यक्ती आपल्याला ‘प्रिय’ वाटते. मग ही कमतरता किंवा अपुरेपणा भावनिक अर्थात मानसिक असेल किंवा भौतिक असेल. एखाद्या प्रिय व्यक्तीशी जेव्हा वियोग होतो तेव्हा आपल्याला होणारं दुख त्या व्यक्तीच्या प्रेमासाठीचं नसतं, तर त्याच्या अभावानं आपण एकाकी पडलो, याचं अधिक असतं. हा वियोग मृत्यूनं झाला असेल, तर एक वेळ तो पचवता येतो, पण मतभेदानं वियोग झाला असेल, तर त्याचा आघात अधिक खोल असतो. कारण त्यात अहंकाराला धक्का बसलेला असतो. तेव्हा आपण खरंच जगाचे असतो का हो? तर नाही. आपण स्वतचेच आणि ‘अहं’ला केंद्रस्थानी ठेवून जगणारे असतो. अशा या ‘मी’वर ‘तू’ला केंद्रस्थानी ठेवण्याची शिकवण साधनेनं बिंबते. म्हणजे मी खरा तर त्यांचा आहे, सद्गुरूंचा आहे, हे जाणणं हाच साधनेचा हेतू आहे. आता कुणी म्हणेल, ही परावलंबित्वाची शिकवण झाली. सद्गुरूचा किंवा परमात्म्याचा बनून जगणं हा आत्मघातकीपणाच नाही का? तर मग असं पाहा, माणूस जन्मापासून मरेपर्यंत स्वतला कुणाचा ना कुणाचा तरी मानतोच ना? कुणाला तरी स्वतचा मानतोच ना? मग तो स्वतला कुणाचा मुलगा, कुणाचा पती, कुणाचा बाप, कुणाचा भाऊ, कुणाचा मित्र अन् कुणाचा शत्रूही मानत असतो. त्याचप्रमाणे तो कुणाला आपला आप्त, कुणाला मित्र तर कुणाला शत्रूही मानत असतो. त्याची ही मान्यता अगदी ठिसूळ पायावर उभी असते. जर तो कुणाला तरी आपला मित्र मानत असतो, तर मग मित्राचा शत्रूही कसा होतो? रक्तानं आलेल्या नात्यांमागील भावनेत चढउतार का होऊ देतो? मग याचा अर्थ सगळी नातीगोती, संबंध संपले का? तर नाही. संबंध प्रारब्धानं निर्माण झाले आहेत ते कर्तव्यपालनासाठीचा कित्ता मात्र मानून कर्तव्य पार पाडत गेलं पाहिजे. जगाशी संबंध कर्तव्यापुरता आहे. त्यामुळे कर्तव्य पार पाडून जगाच्या प्रभावापासून मनानं दूर होता आलं पाहिजे. मग आपलं खरं कोण आहे? तर ज्याला आपल्या हिताचीच खरोखर काळजी आहे तोच खरा आप्त आहे! असा केवळ सद्गुरूच असतो. भोंदू गुरूला तुमच्या हिताची काळजी नसते बरं का! त्याला भौतिकानं बरबटलेल्या त्याच्या विरक्तीच्या प्रदर्शनाचीच काळजी असते! तर खरा आप्त खरा सद्गुरूच आहे. मी त्याचाच आहे, हे वाटलं पाहिजे. यात निष्क्रियता नाही. पलायनवाद नाही. कर्तव्यविन्मुखता नाही. तर जगाप्रतीची सर्व कर्तव्यं पार पाडत असताना आपण खरे तर शाश्वताचेच आहोत. हे ओळखून सर्व मिथ्याभास मावळणं, म्हणजे त्यांचं होणं आहे.
चैतन्य प्रेम