जगप्रसिद्ध कादंबरीकार मिलान कुंदेरा यांच्या नव्या कोऱ्या कादंबरीचं हे अवलोकन.. मर्ढेकरप्रेमी मराठी माणसाच्या नजरेतून!

बा. सी. मर्ढेकर यांचा हा प्रश्न, त्या कवितेच्या छंदाप्रमाणेच अभंग आहे. मुळात मर्ढेकरांना हा प्रश्न पडला तो दुसऱ्या महायुद्धानंतरचे चटके बसत असतानाच्या काळात, म्हणजे आधुनिकतावादी मानवोद्धार हा प्रत्यक्षात उद्धार वगैरे नाहीच, असा निष्कर्ष कोणाही सुबुद्धानं काढावा अशा काळात. हा प्रश्न उद्धृत करावा असे बरेच प्रसंग जगात घडले, त्यापैकी अनेकदा मराठीत हे अवतरण अनेकांनी दिलंही आहे. याउलट, वयाच्या विशीपूर्वीच महायुद्ध आणि पुढे पंचेचाळिशीपर्यंत शीतयुद्धकालीन पोलादी पडद्यामधली होरपळ अनुभवलेल्या मिलान कुंदेरा यांना मर्ढेकर किंवा त्यांच्या कविता (ज्या विंदांप्रमाणे इंग्रजीत संग्रहरूपानं नाही आल्या) माहीत असण्याची शक्यता शून्य. पोलादी पडद्याच्या भूतपूर्व चेकोस्लोव्हाकियातून निसटून कुंदेरा फ्रान्सच्या आश्रयाला गेला आणि आधीच काम्यूकाफ्का वाचून अस्तित्ववादाकडे झुकलेला त्याचा जीवनविषयक दृष्टिकोन उत्तराधुनिकतेकडे वळू लागला. या दोन्ही तात्त्विक भूमिकांच्या मिश्रणातून जे काही भावनिक/ वैचारिक रसायन तयार झालं, ते त्याच्या नऊ कादंबऱ्या आणि (कादंबरी या वाङ्मयप्रकाराबद्दल ममत्व असणाऱ्या प्रत्येकानं वाचलंच पाहिजे अशा) ‘आर्ट ऑफ द नॉव्हेल’ या चिंतनपर निबंधसंग्रहातून व्यक्त होत गेलं. कुंदेरा आज ८६ वर्षांचा आहे (तरीही, बहुधा तो लेखकराव न झाल्यानं त्याला इथं आपण ‘अरे-तुरे’ करतो आहोत) आणि त्याची नवी कादंबरी, तब्बल १३ वर्षांनंतर आली आहे. ही कादंबरी इंग्रजीतही गेल्याच महिन्यात आली आणि आपल्या ग्रंथदुकानांत ती जुलैअखेर थडकली. या कादंबरीतून मर्ढेकरांच्या त्या बेंबीसवालाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्नच जणू कुंदेरानं केलाय अशी खूणगाठ मराठी-इंग्रजी वाचकांनी बांधायला हरकत नाही.

कादंबरी बेंबीपासून सुरू होते. म्हणजे काय, हे समजून घेण्याआधी पारंपरिक पद्धतीनं पात्रपरिचय करून घेऊ.. रेमन, अ‍ॅलन, चार्ल्स आणि कॅलिबान यांच्याबद्दल लेखक अधिक बोलतो, म्हणून ते ‘नायक’ म्हणू; तर रेमनचा सहकारी डिआर्डेलो हा या कादंबरीच्या सुरुवातीच्या आणि अखेरच्या भागात अगदी ‘कारक घटका’सारखा महत्त्वाचा ठरतो. त्यापेक्षा कमी महत्त्व काकेलिक् नावाच्या पात्राला असलं तरी कादंबरीचं तात्पर्य हे काकेलिक् -वृत्तीचा उद्घोषच करणारं आहे. माणसं म्हणून या सहा पुरुषांना उभं करताना, कुंदेरा त्यांच्या वृत्तींबद्दल आपल्याला कथानकातूनच सांगतो. यामुळे कादंबरीचं वर्णन ‘अस्तित्वाच्या शोधात सहा पात्रे’ असंही करता येईल. पण आयुष्याबद्दल- अस्तित्वाबद्दल कुतूहल आणि कोडंही कुणाला कसं आहे, याचा उलगडा पहिल्या चौघांबद्दलच अधिक होतो. यापैकी कॅलिबान आयुष्य साजरंच करण्यासाठी धडपडणारा (आणि अखेर जायबंदीसुद्धा होणारा) एक अभिनेता आहे, तर चार्ल्स हा आपलं आयुष्य आपणच रचलं पाहिजे, यासाठी आखणी करू पाहणारा (पण शिस्तीचं वावडं असल्यामुळे आखणीसुद्धा, जशी होईल तशी चालल्येय अशा पद्धतीनं करणारा) आहे. त्या मानानं रेमन हा जरा शांत आहे आणि त्याच्याकडे ‘साक्षीभाव’ किंवा निरीक्षक-विश्लेषकवृत्तीही आहे; तर डिआर्डेलोला ‘निव्वळ जगण्या’वर मांड ठोकण्याची आकांक्षा इतकी की, त्यासाठी ‘मला कर्करोग आहे- तरीही मी आनंदात’ असा बनाव तो रेमनपाशी रचतो. अ‍ॅलनला स्वत:च्याच अस्तित्वाचा अर्थ शोधायचाय. कारण त्याच्या जन्मदात्रीचं -घटस्फोटित आईचं- प्रेम त्याला प्रत्यक्षात कधी लाभलंच नाही. अ‍ॅलनची वृत्ती अभ्यासू असली तरी चतुरस्र अभ्यासक न होता तो एकाच विषयात अडकून पडतो आणि अखेर या विषयाची सिद्धीच मिळावी तद्वत, आई भासमय पद्धतीनं त्याच्यासोबत राहू लागते!
अ‍ॅलनच्या आईखेरीज पाच स्त्रिया कादंबरीत आहेत- अ‍ॅलनच्या भासवास्तवात घडणाऱ्या ‘खऱ्या’ प्रसंगातली एक गर्भवती, डिआर्डेलोच्या घरातली घरकामगार, त्याची गर्विष्ठ मुलगी.. आणि डिआर्डेलोनंच ‘कर्करोगातही जगतोय’ अशा आविर्भावात दिलेल्या वाढदिवस पार्टीत भेटणाऱ्या दोघी- या कादंबरीत येतात. पार्टीतल्या दोघींपैकी ज्यूली काकेलिक्ला आयतीच रात्रभर मिळते, तर मादाम फ्रँक ही प्रमदा ‘एकटेपण म्हणजेच आयुष्य.. आपलं एकटेपण, इतर एकेकटय़ांच्या एकटेपणानं वेढलेलं..’ अशी भूमिका भर पार्टीत मांडून डिआर्डेलोसारख्या तिच्या मूक चाहत्यांना थिजवूनच टाकते. ला फ्रँकनं जाहीर केलेली तात्त्विक भूमिका ही अस्तित्ववाद्यांची आवडती आहेच, एवढं आपण इथं लक्षात ठेवू.
‘अर्थ काय बेंबीचा?’ यासारखा प्रश्न अ‍ॅलनला पडतो; तो अगदीच निर्थक पद्धतीनं.. म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या मुली पाहताना! पॅरिसच्या नवयुवती गेल्या १५ वर्षांत बेंबी दाखवणारे कपडे- अपरा टीशर्ट आणि जीन्स वगैरे- लेवू लागल्या आहेत, म्हणजे जग बदललंय की काय, असं या प्रश्नाचं पूर्वरूप. स्त्रीदेहाचं सौंदर्यनिधान म्हणून पुरुषांनी नितंब, वक्ष, सक्थिनीप्रदेश म्हणजे मांडय़ा यांचं स्तोम माजवलं. यापैकी प्रत्येक स्तोमाचा लक्ष्यार्थ हा त्या त्या वेळच्या सांस्कृतिक घडीशी सुसंगत असणार, असा निष्कर्ष काढणं अ‍ॅलनला आवडतं. आईनं एकमेव प्रत्यक्ष भेटीत, अ‍ॅलन दहा वर्षांचा असताना, त्याच्या बेंबीला बोट लावलं होतं आणि ती अगम्य कडवट हसली होती, हेही अ‍ॅलनला आठवतंय.. आपण जर आईला नकोसे होतो, तर आपला ‘निर्मितीक्षण’ म्हणजे अगतिकतेच्या पराकोटीचं भीषण रूपच असेल, असं मानून न थांबता तो ‘त्या क्षणी’ वैर, तिरस्कार, विजयोन्माद आणि जितहताशा अशा नकारात्मक भावनांचा कल्लोळ आई-वडिलांच्या चेहऱ्यांवरही कसा दिसत असेल, याची कल्पना करतो. किंबहुना कोणतंही मानवी व्यक्तिमत्त्व हे ‘त्या क्षणी’ जन्मदाते कसे होते, याचं फलित असतं, अशा निष्कर्षांला अ‍ॅलन पोहोचतो.
हे निष्कर्ष तो कादंबरीच्या अखेरीस रेमनला सांगतोसुद्धा. पण रेमनचं म्हणणं वेगळं असतं. हा रेमन, जगता जगता विचार करणारा आहे. कादंबरीच्या मुखपृष्ठावरलं- स्वत:चाच एक डोळा हातात घेऊन, जणू शरीरातून आणि देहजाणिवांच्या बाहेरून- वाचकांकडे पाहणाऱ्या मानवी आकृतीचं चित्र (कुंदेरानंच रेखाटलंय ते!) हे रेमनचंच असावं. हा रेमन कादंबरीच्या अखेरीस जे बोलतो ते अस्तित्ववादानं एकलकोंडेपणाचं जे तात्त्विकीकरण केलं, त्यापेक्षा विपरीत असतं. तो इतिहासातही आरपार पाहून, ‘इनसिग्निफिकन्स’मधलं -म्हणजे बिनमहत्त्वाचेपणातलं- सुख जाणतो, इतरांना सांगतो. जगणं म्हणजे मानवी अस्तित्वाच्या बिनमहत्त्वाचेपणाचा उत्सव, असं हा रेमन सुचवतो.
पण हे जे रेमननं जाणलंय, ते कसं काय जाणलं?
हाच तर कादंबरीचा महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी कुंदेरा त्याच्या नेहमीच्या शैलीनुसार इतिहासाचा आधार घेतो आहे. भारतीयांना अधिक परिचित असलेल्या ‘इम्मॉर्टलिटी’ या कुंदेराच्याच कादंबरीत जर्मन महाकवी गटे वगैरे येतात, तसा इथं या कादंबरीत स्टालिन आणि त्याचा विश्वासू सहकारी कालिनिन यांचा इतिहास येतो. कालिनिनला वारंवार लघवी होण्याचा त्रास आहे. त्यामुळे अनेकदा अनवस्था ओढवते. पंचाईत आणि मानहानी सहन करत, म्हणजे नाइलाज पूर्णत: स्वीकारून कालिनिन हा स्टालिनचा ‘अनुयायी’च राहातो. स्टालिनबद्दल इतर सहकारी नाखूश होऊ लागलेले आहेत. नाखुशीचा स्फोट लवकरच होणार आहे आणि स्टालिनच बिनमहत्त्वाचा ठरणार आहे. ही अशी ऐतिहासिक तथ्यं चार्ल्स पुस्तक वाचून सांगतो आणि हेच कथानक आपण कळसूत्री बाहुल्यांच्या नाटकासाठी वापरायचं, असं ठरवतो. या नाटकात तर स्टालिन परागंदाच होणार आहे. पण त्याही वेळी कालिनिन त्याच्यासह असणार आहे.
‘राजकीय इच्छाशक्तीचं विराटदर्शन लोकांना झालं पाहिजे. ती इच्छाशक्ती मी प्रकट करणार आहे’ असं काहीसं स्टालिनचं म्हणणं! ते लवकरच खोटं ठरणार असतं. हुकूमशहा कसा असतो आणि कसा पडतो किंवा माणसं नेता होतात कशी आणि नेते पडतात ते कसे, यापुरतं चार्ल्सचं कुतूहल सीमित असल्यानं ते शमणार असतं. रेमनच्या घरच्या पार्टीचा आयोजक चार्ल्स आणि वाढपी कॅलिबान. त्याचं कुतूहल थेट आत्ता लोक काय बोलताहेत इतपतच कुंठलेलं. रेमन हा चार्ल्स व कॅलिबानचा मित्रच, त्यामुळे पार्टीतही तो त्यांच्याशी बोलतो. ते शमवण्यासाठी मुळात नट असलेला कॅलिबान नेहमीच, एका अगम्य भाषेत लोकांशी बोलतो आणि ‘मला तुमची भाषा कळत नाही’ असा विश्वास लोकांना देतो. (या भाषेला कुंदेरानं ‘पाकिस्तानी’ म्हणावं, हा भारतीय उपखंडाचा अवमान आणि कुंदेराच्या युरोपमंडूक वृत्तीचा कळस आहे. पण मुद्दा तो नाही). रेमन या दोघांच्याही कुतूहलांना परस्पर उत्तर देतो. तो म्हणतो की, विनोद आता कुणाला कळत नाहीत. ‘‘माणसांना हे कळून चुकलंय की जग बदलता येणार नाही.. उठाव करता येणार नाहीत. आहे तेच स्वीकारावं लागेल.. या अशा स्थितीत जगण्याची किल्ली एकच- काही म्हणजे काहीच गांभीर्यानं घ्यायचं नाही नि आहे तसं जगायचं. यात नुकसान होतंय ते विनोदाचं’’ आणि ‘‘आपण ‘‘विनोदोत्तर जगात- म्हणजे ‘पोस्ट-जोक एज’मध्ये जगतोय आपण’’ -ही वाक्यं ७५ आणि ७७व्या पानांवर रेमनच्या तोंडी आहेत. (त्यातला निष्कर्ष अजिबात युरोपमंडूक नाही. भारतीय उपखंडालाही तो लागू पडेल, पण मुद्दा तो नाही).
तत्त्वचर्चा हा या कादंबरीचा प्राण आहे. चार-पाच वेगवान आणि नाटय़पूर्ण घटना, इतिहासातलं एक प्रकरण, दोघा पात्रांचं भावविश्व आणि कॅलिबान व डिआर्डेलोकडली घरकामगार बाई यांच्यात जुळणाऱ्या धाग्यांतून शहरी, पुरुष आणि ग्रामीण, स्त्री यांच्या स्थायिभावांमधला (सोप्प्या शब्दांत : अनुक्रमे भोगी आणि प्रेमी, हा) फरक वगैरेंमुळे कादंबरीत ‘गोष्ट’ येते. पण कुंदेराला माणसांच्या विद्यमान जाणिवांचा इतिहासकार बनायचं आहे. तो पट कादंबरीतून हळूहळू उलगडतो. आधीच्या कादंबऱ्यांतले मानवी नमुने कुंदेरा इथं ‘पुनर्रचित’ करतोय, हे त्याच्या वाचकांना कळेलही- पण तरीही कुंदेरानं जाणीवपट कसा विणला आहे, याचं अप्रूप राहील.
कादंबरीचा शेवट दोन-तीन पातळ्यांवर आहे. त्यापैकी स्टालिन आणि कालिनिनची पातळी सर्वाधिक नाटय़मय असल्यानं ती या मजकुरात न सांगणं इष्ट. पण अन्य दोन पातळ्या म्हणजे (१) बेंबीचा एकविसाव्या शतकातला अर्थ (२) तत्त्वविचार आणि जगणं यांतली तफावत किंवा या दोहोंच्या एकीकरणाची स्थिती. यापैकी बेंबीचा अर्थ जननक्रियेपासून सुरू होतो हे (मर्ढेकरांप्रमाणेच!) कुंदेराला -रेमनला- मान्य आहे. पण एकविसाव्या शतकात बेंब्या दाखवण्याची (पॅरिसमध्ये) आलेली फॅशन हे कामक्रिया- जननक्रिया यांच्याबद्दल ‘अनामिक भीती’ अजिबात न बाळगणाऱ्या- किंवा खरं तर, औषधालासुद्धा ‘अनामिक’ भावना न उरलेल्या पिढीचं द्योतक आहे, असा अर्थ येतो.
तत्त्वविचार आणि जगणं यांमधली दुविधा व एकी सांगणारा प्रसंग असा की, ‘जगणं कितीही सुंदर झालं किंवा केलं, तरी मुळात जगणं म्हणजे बिनमहत्त्वाचेपणाचा उत्सव’ (मर्ढेकरांच्या शब्दांत- ‘का हे बांधकाम सुंदर। फक्त नश्वरतेचेच मखर। अथवा दर्शनी महाद्वार। मिथ्यत्वाचे॥’ आणि ‘वास्तुशास्त्र कां बिलोरी। योजिसी येथेच मुरारी। धाडिशी वस्तीला भाडेकरी। बिलोरीच?’) असं डिआर्डेलोला आपण सांगितलेलं कळतंय पण ‘वळत’ नाही, हे जेव्हा रेमनच्या लक्षात येतं तेव्हा, डिआर्डेलोच्या जीवनप्रेमाचे कंगोरे लक्षात घेऊन रेमनच विषय बदलतो आणि मादाम फ्रँकसुद्धा तुझ्यावर लट्टू आहे, असं डिआर्डेलोला सांगतो. डिआर्डेलोचं खोटं समाधान अबाधित ठेवणारा रेमन, ‘बिनमहत्त्वाचेपणा’च्या तत्त्वज्ञानाचा बडिवार माजवणं टाळतो!
कुंदेराची जी भूमिका यातून प्रतीत होते ती अशी की : हा बिनमहत्त्वाचेपणा किंवा ‘बिलोरीपणा’ आता सर्वज्ञात झाला आहे. सर्व माणसांनी तो स्वीकारला आहे. विनोदही नाही आणि गांभीर्यही नाही, अशा स्थितीत जगण्याचा ‘फक्त’ उत्सव करणारे आपण.. तेव्हा, ‘आपल्याला बेंबीच्या अर्थाची मातबरीच आता उरलेली नाही,’ हाच कुंदेराकडून आपणा मराठीभाषक इंग्रजी वाचकांपर्यंत पोहोचणारा ‘बेंबीचा अर्थ’ असू शकेल.

– अभिजीत ताम्हाणे
abhijit.tamhane@expressindia.com

 

> द फेस्टिव्हल ऑफ इन्सिग्निफकन्स
लेखक : मिलान कुंदेरा
प्रकाशक : फेबर अ‍ॅण्ड फेबर
पृष्ठे : ११५,
किंमत (पुठ्ठाबांधणी) : ७५० रु.