‘‘मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की, वैयक्तिक विचारांपेक्षा राजनिष्ठा मोठी असते या तत्त्वाला मी सदैव प्राधान्य देईन, कायदा काय म्हणतो यापेक्षा केंद्र काय म्हणते याकडे माझे सदैव लक्ष असेल. एखाद्यावर कारवाईच्या संदर्भात केंद्राने आखून दिलेल्या धोरणांच्या विरोधात मी कधीही जाणार नाही तसेच आरोपी असलेल्या विरोधकांशी हातमिळवणी करणार नाही. सरकारी कागदपत्रे तसेच नोंदी यांना मी ‘प्रेमपत्रांचा’ दर्जा देत ते कायम जपून ठेवण्याचा प्रयत्न करेन, तसेच ती ‘फुटतील’ असे कोणतेही कृत्य माझ्या हातून घडणार नाही. केंद्राच्या धोरणानुसार एखाद्यावर कारवाई करताना ती बेकायदा किंवा कायद्याच्या चौकटीत बसणारी नाही असे माझ्या लक्षात आले तरी विचलित न होता ती चौकटीत कशी बसवता येईल यावर विचार करण्यावर माझा भर असेल. अशा कारवाईमुळे एखादी निरपराध व्यक्ती वा नेता फसतो आहे असे लक्षात आल्यावरही माझे मन द्रवणार नाही अशी हमी मी देत आहे. तरीही असा द्रवण्याचा प्रसंग आलाच तर योगासनांद्वारे त्यावर मात करून मन स्थिर करण्यासाठी मी प्रयत्न करेन. एखाद्यावरील कारवाईच्या संदर्भात केंद्र राबवत असलेले धोरण दडपशाहीचे आहे असे जरी माझ्या लक्षात आले तरी त्यामुळे व्यथित न होता धोरणानुसार काम करण्यावर माझा भर असेल. ही दडपशाही अन्याय करणारी आहे असे म्हणत बंडाचा विचार माझ्या मनात कधीही येऊ देणार नाही. ‘पिंजरातोड’सारख्या देशविघातक अभियानाला मी कधीही बळी पडणार नाही किंवा त्याविषयीची सहानुभूती माझ्या मनात निर्माण होऊ देणार नाही. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी कोणत्याही राजकीय विचारसरणीशी निगडित असली तरी मी कार्यालयीन प्रकरणे हाताळताना त्याच्या प्रभावात येणार नाही. कर्तव्य बजावताना सत्ताधाऱ्यांची जी विचारसरणी असेल त्यालाच उपयुक्त असे कृत्य माझ्या हातून घडेल. पिंजऱ्यातल्या पोपटाने ‘मिठू मिठू’ करत गोड आवाजात बोलण्यातच त्याचे हित असते हा वाक्प्रचार मी मूल्य म्हणून स्वीकारला असून निवृत्त होईपर्यंत मी त्याचे पालन करेन. रोज वरिष्ठांकडून मिळणारे मार्गदर्शन व विविध वृत्तपत्रांच्या वाचनातून केंद्राच्या धोरणाची हवा कोणत्या दिशेला वाहते आहे याकडे माझे कायम लक्ष असेल व त्यानुसारच माझी कृती असेल. एखाद्या प्रकरणात माझे मत धोरणाच्या विरुद्ध बनले तरी ते वरिष्ठांकडे व्यक्त करणे किंवा संचिकेवर त्याची नोंद घेण्याचा अनाठायी प्रयत्न माझ्याकडून कधीही होणार नाही. माझ्या मनात यावरून कितीही वादळ उठले तरी विरोधकांच्या प्रलोभनाला बळी पडणार नाही. कर्तव्य बजावताना केंद्राचे धोरण एकीकडे पण कायदा दुसरीचकडे, असा बाका प्रसंग निर्माण झाल्यास मी ठामपणे धोरणाच्या बाजूने उभा राहीन. तरीही अनवधानाने माझ्या हातून चूक घडलीच तर कोणत्याही शिक्षेसाठी मी पात्र असेन. जय हिंद!’’ अशी भलीमोठी शपथ कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर घेऊन मगच केंद्राच्या तपास संस्थेचे एकेक अधिकारी आत प्रवेश करत होते. आपल्याच एका उपनिरीक्षक सहकाऱ्याच्या अटकेनंतर दिल्लीच्या आदेशावरून सुरू झालेले हे शपथनाट्य पार पाडताना अनेक जण घामाघूम झाले होते. त्यातल्या काहींनी थोडी मोकळी हवा यावी म्हणून एक खिडकी उघडली. तसे सर्वांचे लक्ष त्याकडे गेले. खिडकीला लावलेले गज पाहताच आपण पिंजऱ्यातच सुरक्षित अशी जाणीव त्या क्षणी सर्वांना झाली व घामाकडे दुर्लक्ष करत प्रत्येक जण संचिका निरीक्षण व पुढील कारवाईच्या तयारीत गढून गेला.