कादंबरीला ‘नवलकथा’ आणि कथेला ‘वार्ता’ असे गुजरातीत म्हणतात. या भाषेचा साहित्यप्रांत संकुचित होतो की काय, अशी चिंता वाटण्याच्या काळात अनेक नवलकथा/ वार्ताकारांना रघुवीर चौधरी यांनी एकत्र आणले. गुजराती साहित्य परिषदेला त्यांनी पुन्हा उभारी दिली आणि या संस्थेचे भवन उभे राहावे, म्हणून प्रयत्न केले. ‘रंगद्वार’ ही स्वतची प्रकाशन संस्था स्थापून नवसाहित्याला उभारी देतादेता साने गुरुजींच्या ‘अस्तिक’सारख्या कादंबऱ्या गुजरातीत आणविल्या. या साहित्यिक- संघटनकार्याची आठवण आता, रघुवीर चौधरी यांना त्यांच्या साहित्यसेवेबद्दल ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला असताना होणे साहजिक आहे. रघुभाईंची साहित्यसेवा ही केवळ त्यांच्या (तब्बल) ८० पुस्तकांपुरती मर्यादित मानता येऊ नये, एवढे त्यांचे संघटन कार्यही मोठे आहे.
माध्यमिक शाळेत, भोलाभाई पटेल यांच्या रसाळ अध्यापनामुळे साहित्याकडे ओढले गेलेले रघुभाई कविता लिहू लागले आणि कवी म्हणूनच प्रथम स्थिरावले. पण ‘अमृता’ ही त्यांची कादंबरी केवळ प्रेमाच्या त्रिकोणाची गोष्ट न राहाता गुजराती ‘नवलकथां’ना अस्तित्ववादाचे भान देणारी ठरली आणि पुढे गद्यलेखनाचा वेलू वाढत गेला. गुजरातीतील चारही महत्त्वाच्या दैनिकांत रघुवीर चौधरींचे स्तंभलेखन आले. यापैकी ‘तिलक करे रघुवीर’सारख्या स्तंभांची पुस्तकेही झाली. नाटय़लेखन, समीक्षापर लेखन, मोरारीबापूंचे कथामय चरित्र असेही लिखाण रघुभाईंच्या हातून झाले असले तरी, त्यांचे खरे कार्य आहे नवलकथा, वार्ता आणि टुंकीवार्ता (लघुकथा!) या साहित्यप्रकारांत. त्यांच्या लघुकथा नाटय़मय संवादांना महत्त्व देणाऱ्या आहेत, तर कथांमध्ये लेखकीय आवाजातील वर्णने अधिक आहेत. हा लेखकीय आवाज कादंबऱ्यांमध्ये चिंतनशीलही बनतो आणि गोष्टीच्या पलीकडले जग, त्या जगातले मूल्यविषयक प्रश्न असा पट मांडतो.
बहुप्रसवा आणि पल्लेदार लेखणी, हे रघुभाई चौधरींचे वैशिष्टय़च. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा अवघे नऊ वर्षांचे असलेले रघुभाई, घरच्या धार्मिक-पारंपरिक वातावरणातून पुढे, परंपरांकडे डोळसपणे पाहणाऱ्या गांधीवादाकडे आकृष्ट झाले. त्या काहीशा आदर्शवादी विचारांना १९६०च्या दशकात आधुनिकतावादी मूल्यांचे जे जागतिकीकरण झाले, त्याने १९६५ सालच्या ‘अमृता’ची वाट दाखविली. दहाहून अधिक आवृत्त्या निघालेल्या ‘अमृता’च्या पुढे जाताना रघुभाईंनी पुन्हा इतिहास आणि परंपरा यांकडे पाहिलेले दिसते.
अनेकदा उद्ध्वस्त होऊनही धर्म टिकवणारे सोमनाथ मंदिर, गांधीजींच्या विदेशी सहकारी युवतीचा भारतीय नजरेने धांडोळा, व्यापार-उद्योगातील निष्ठा/सचोटी, ग्रामजीवनातील मूल्यांना शहरीकरणाचे आव्हान हे भारतीयतावादी चर्चाविश्वातील विषय त्यांच्या कादंबऱ्यांनी आकळून घेतले आहेत. तरीही ‘प्रतिगामी’ किंवा ‘परंपरावादी’ हा शिक्का त्यांच्यावर मारला गेला नाही, याचे कारण गांधीवादात सापडेल!