25 February 2021

News Flash

प्रकाशाची शाळा

‘माझी ‘व्हिजिटिंग फी’ खूप जास्त आहे!’’ यावर बाटलीवाला बाबांना म्हणाले, ‘‘आम्हाला मान्य आहे.

पन्नाशी गाठलेल्या बाबा आमटेंच्या पलवानी शरीराने आजवर अनेक आघात आणि गंभीर दुखणी पचवली होती; त्यात आता ‘सव्‍‌र्हायकल अ‍ॅण्ड लंबर स्पाँडिलोसिस’ या पाठीच्या कण्याच्या आजाराची भर पडली आणि त्यांना (मनाविरुद्ध) काही महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. बाबांना त्यांची मान जरासुद्धा हलवता येत नसे. पण त्याबद्दलही ते विनोद करताना म्हणत, ‘‘मी आयुष्यभर कधी मागे वळून पाहिलं नाही. आता तर मला बाजूलासुद्धा वळून बघता येत नाही!’’ तरीसुद्धा त्यांचं सामाजिक विषयांवरचं वाचन अखंड सुरू होतं. त्यादरम्यान त्यांच्या वाचनात एक धक्कादायक आकडेवारी आली. तत्कालीन ४३ कोटी लोकसंख्येच्या भारतात अंध व्यक्तींची संख्या २० लाख एवढी लक्षणीय होती. पण देशपातळीवर या क्षेत्रात केवळ १०० संस्था प्रत्यक्ष कार्यरत होत्या. अख्ख्या मध्य भारतात तर अंधांच्या क्षेत्रात काम करणारी एकमेव संस्था नागपुरात होती. मात्र, ग्रामीण भागातील अंध व्यक्तींसाठी कुठलाच पर्याय उपलब्ध नव्हता. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन बाबांनी या प्रश्नाला हात घालण्याचा निश्चय केला आणि एक नवी संकल्पना त्यांच्या डोक्यात आकार घेऊ लागली.

याच दरम्यान घनश्याम गायधने आणि रमेश गुल्हानी हे दोन तरुण अंध संगीतशिक्षक निव्वळ योगायोगाने बाबांसमोर येऊन उभे राहिले. ते साल होतं १९६५. त्याचं झालं असं की, अंधांसाठी विदर्भात कुठे, काय काम चालतं हे जाणून घेण्यासाठी ही जोडगोळी फिरत होती. एकदा ट्रेनने चंद्रपूरला जात असताना वरोऱ्याच्या अलीकडे या दोघांना मारहाण झाली. त्यामुळे हे दोघं वरोरा स्टेशनवर उतरले. वरोऱ्याच्या स्टेशनमास्तरांनी त्यांचं औषधपाणी करत चौकशी केली. त्यांच्या प्रवासाचं प्रयोजन लक्षात आल्यावर स्टेशनमास्तर त्यांना म्हणाले, ‘‘इथे जवळच बाबा आमटेंचं आनंदवन आहे. तुम्ही बाबांना भेटा, ते नक्कीच तुम्हाला मदत करू शकतील.’’ आणि अशा प्रकारे स्टेशनमास्तरांनी त्या दोघांना आनंदवनात बाबांपर्यंत आणून पोहोचवलं. आनंदवनाचं काम समजून घेतल्यानंतर चच्रेअंती गायधनेंनी बाबांना आनंदवनात अंधांसाठी शाळा सुरू करण्याची विनंती केली. बाबांच्या डोक्यात तर ते आधीपासूनच घोळत होतं. बाबा त्वरित म्हणाले, ‘‘जरूर..!’’ मग काय, बाबा, गायधने, गुल्हानी यांनी बरेच प्रयत्न करून शाळेसाठी परवानगी मिळवली आणि १ जून १९६६ ला ‘प्रकाशाची शाळा- Sunshine Home for the Blind’ अस्तित्वात आली. शाळेचं नामकरण ‘आनंद अंध विद्यालय’ असं करण्यात आलं. लवकरच पंढरीनाथ वासनिक नावाचे आणखी एक अंध शिक्षकही गायधने, गुल्हानी यांच्या जोडीला आले. गुल्हानी यांना बाबांनी मुख्याध्यापकपदाची जबाबदारी दिली. आनंद अंध विद्यालय म्हणजे अख्ख्या मध्य भारतातील ग्रामीण भागामध्ये केवळ अंधांसाठी असलेली पहिलीच निवासी शाळा! बाबा म्हणत, ‘‘माझ्या आनंदवनात एक शाळा आहे- ‘प्रकाशाची शाळा’! आंधळ्या मुलांच्या डोळ्यांच्या पापण्यांना प्रकाशाची कवाडे पाहायची जिद्द आहे.’’

आनंद अंध विद्यालयाची बाबांची संकल्पना मूर्त स्वरूपात आणली ती मुकुंद वैशंपायन यांनी. मुकुंदरावांचा आनंदवनापर्यंतचा प्रवास फारच वेदनादायी होता. मुकुंदराव मूळचे रायगड जिल्ह्यतील पेणचे. घरी आई, वडील आणि लहान भावंडं. विशीतले मुकुंदराव पोस्टात नोकरीला होते. पण कुष्ठरोगाने त्यांच्यावर घाला घातला. हा धक्का सहन न झाल्याने त्यांच्या वडिलांचं मन:स्वास्थ्य बिघडत गेलं आणि त्यातच त्यांचं निधन झालं. दुर्दैवाने आईलासुद्धा क्षयाची बाधा झाली आणि मागोमाग त्याही निवर्तल्या. कुष्ठरोगावरची औषधं अत्यंत मोजकी आणि ठरावीक रुग्णालयांमध्येच मिळायची. म्हणून मुकुंदरावांनी आधी आयुर्वेदिक उपचार घेतले. पण गुण काही आला नाही. रोग वाढू लागला तशी नोकरीही हातची गेली. भावंडं शिकत होती. त्यामुळे उपचार घेऊन बरं होत घराला सावरणंही गरजेचं होतं. मुंबईतल्या वडाळ्याच्या अ‍ॅकवर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये कुष्ठरोगावर उपचार होतात, हे कळताच मुकुंदराव तिथे गेले आणि स्वत:ला उपचारार्थ दाखल करून घेण्याबाबत विनंती केली. तिथे त्यांना सांगण्यात आलं, ‘‘हॉस्पिटलमध्ये या प्रकारे दाखल होता येत नाही. तुम्हाला पोलिसांकरवी स्वत:ला अटक करवून घेत इथे दाखल व्हावं लागेल.’’ मुकुंदराव भांबावून गेले आणि चक्रावलेसुद्धा! हे नेमकं काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनात चौकशी केली. तिथे त्यांना सांगण्यात आलं, ‘‘तुम्हाला इतर कुष्ठरुग्णांप्रमाणे भीक मागावी लागेल. मग तुम्हाला ‘Bombay Prevention of Begging Act, 1959’ अंतर्गत अटक केली जाईल, त्यानंतर न्यायालयापुढे उभं केलं जाईल, आणि मग न्यायालयाने आदेश दिला तरच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती केलं जाईल.’’ मुकुंदराव सुशिक्षित होते, पण परिस्थितीपुढे हतबल होते. पोलिसांनी सांगितलेले सर्व सोपस्कार त्यांनी जसेच्या तसे पार पाडले आणि ते अ‍ॅकवर्थ लेप्रसी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. चार वर्ष उपचार घेतल्यानंतर मुकुंदराव पूर्ण बरे झाले. मात्र, कुष्ठरोगाविषयीचे समाजातले गरसमज, टोकाची मानसिकता आणि नातेवाईकांनी दाखवलेली अनास्था यामुळे पुढची तब्बल दहा वर्ष त्यांनी या वॉर्डरूपी सामाजिक तुरुंगातील चार भिंतींच्या आत काढली. १९६६ साली एके दिवशी त्यांनी चिवडा, दाणे, इ. गुंडाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रद्दीतील वर्तमानपत्राच्या कागदावर आनंदवनाबद्दलची माहिती वाचली. नंतर हॉस्पिटलमधल्या काही रुग्ण बांधवांकडूनही त्यांना आनंदवनाबद्दल अधिक माहिती मिळाली. त्यांनी लगेचच बाबांना पत्र लिहीत आपल्याला आश्रय द्यावा अशी विनंती केली. बाबांनी उलटटपाली त्यांना कळवलं, ‘‘आनंदवनी या आणि आवडीचं काम निवडून कामाला लागा. ‘आश्रित’ हा शब्द मला माहीत नाही. हे वन आपलंच आहे.’’

मुकुंदराव लगोलग आपलं सगळं सामान घेऊन आनंदवनात दाखल झाले. त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत बाबांनी त्यांच्यावर नव्याने सुरू होणाऱ्या आनंद अंध विद्यालयाच्या वॉर्डन पदाची जबाबदारी टाकली आणि मुकुंदराव सर्वार्थाने विद्यालयाची ‘दृष्टी’ बनले. बारा अंध मुलं-मुली आणि तीन शिक्षक असा या प्रकाशाच्या शाळेचा प्रवास सुरू झाला. मुकुंदराव आईच्या मायेने मुलांची काळजी घेत. शाळा झाडण्यापासून ते बाजारातून सामान आणण्यापर्यंत सर्व कामं ते स्वत: करत. शाळेत दाखल झालेली लहान मुलं अत्यंत गरीब कुटुंबातली असत. मुकुंदराव अत्यंत संयमाने या मुलांना खाण्यापिण्याच्या, स्वच्छतेच्या सवयी शिकवीत. काही मुलं रात्री अनवधानाने चादर ओली करत. पण कुणावरही न रागावता मुकुंदराव रोज सकाळी या चादरी धुऊनही टाकत. मुलांसोबत गाणी म्हणणं, त्यांना गोष्टी वाचून दाखवणं, संध्याकाळी व्यायाम करवून घेणं असा मुकुंदरावांचा दिनक्रम असे. ते मुलांना बगिचात बिया पेरणं, रोपं लावणं, त्यांना पाणी घालणं, त्यांची जपणूक करणं, इ. गोष्टीही शिकवत. मुलांना आई-वडिलांची आठवण आली की त्यांना वात्सल्याने जवळ घेत समजावणं, कुणी आजारी पडलं की पळापळ करणं, हे सारं ते एकहाती करत. आमच्या आनंद अंध विद्यालयाच्या छोटय़ाशा निष्पाप जगाचे ते ‘ Ever vigilant & loving Sergeant’ होते. लवकरच मुकुंदरावांनी खासगीरीत्या बी. ए. केलं आणि मुंबईला जाऊन ते अंधांसाठी विशेष शिक्षक म्हणून प्रशिक्षित होऊन आले. त्यानंतर काही वर्षांनी बाबांनी शाळेच्या मुख्याध्यापकपदाची धुरा मुकुंदरावांच्या खांद्यावर टाकली. त्यांचे ममत्व बघून इंदूला सानेगुरुजींची आठवण येत असे. गायधने, गुल्हानी आणि वासनिक हे तिघं मुलांना ‘ब्रेल’मध्ये वाचायला, लिहायला अगदी मन लावून शिकवत. शिवाय, गुल्हानी मुलांना बासरी वाजवायला शिकवत. गायधने गाणं म्हणणं, पेटी आणि व्हायोलीन, तर वासनिक तबला. संगीताच्या रूपाने चौथी मिती या सर्वानी अंध विद्यार्थ्यांच्या आयुष्याला जोडली. सोबतच ही मंडळी मुलांना विणकाम, सूतकताई, खुच्र्या आणि स्टूलांचं केनिंग वर्क, मेणबत्त्या बनवणं, इ. गोष्टींचं प्रशिक्षणही देत. बाबाही वेळात वेळ काढून मुलांना मदानी खेळांसाठी, झाडावर चढण्यासाठी खूप प्रोत्साहन देत. त्यांच्याशी लुटुपुटूची कुस्ती खेळत. बाबांच्या लेखी आनंद अंध विद्यालयाचं स्वरूप ‘अंधांसाठी सुरू केलेला एक उपक्रम’ एवढं मर्यादित कधीच नव्हतं. सर्वसामान्य मुलांप्रमाणे अंध मुलांनाही समान संधी मिळाल्या पाहिजेत, इतर मुलांसारखीच ही मुलं वाढली पाहिजेत यासाठी बाबा कायम आग्रही होते.

चांदा जिल्ह्यत अंधत्वाचं प्रमाण खूप जास्त असलं तरी आनंदवन आणि कुष्ठरोग हे समीकरण झाल्याने सुरुवातीच्या दिवसांत अंध विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. त्यांचे पालक म्हणत, ‘परमेश्वराने एक भोग (अंधत्व) दिला; आता हा दुसरा (कुष्ठरोग) नको.’ पण इंदू आणि बाबांच्या जगावेगळ्या दृष्टिकोनामुळे हे चित्र हळूहळू बदलू लागलं. शाळा निवासी स्वरूपाची असल्याने अंध मुलांना फी आकारण्याबाबतचं एक सरकारी परिपत्रक होतं. पण ते स्पष्टपणे झुगारून देत इंदू आणि बाबांनी एक परंपरा कायम केली. बस-रेल्वेभाडय़ाचेही पैसे गाठीशी नसल्याने उधारी करून आपल्या मुलांना कसंतरी शाळेत दाखल करण्यासाठी आणणाऱ्या पालकांकडून पैसे घेण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही. उलट, इंदू-बाबा फक्त मुलांचीच नव्हे, तर त्यांच्या पालकांचीही आवर्जून विचारपूस करत, त्यांच्या जेवणाची, मुक्कामाची सोय करत. आणि त्यांच्या प्रवासभाडय़ाची सोय करूनच त्यांना परत पाठवत. त्यामुळे चांदाच नव्हे, तर नागपूर, वर्धा, भंडारा, यवतमाळ अशा आसपासच्या जिल्ह्यंमधूनही अत्यंत गरीब घरांतील अंध मुलं-मुली या शाळेत येऊ लागली. आनंदवनात मिळणाऱ्या ममत्वाच्या वागणुकीमुळे मुलांचे पालक आपापल्या गावी जाऊन शाळेबद्दल आवर्जून सांगत. त्यातूनच पुढे आनंद अंध विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या मुला-मुलींचा टक्का वाढू लागला.

मुला-मुलींची, शिक्षकांची, कर्मचाऱ्यांची संख्या जसजशी वाढू लागली तशी शाळेसाठी, वसतिगृहासाठी आणि स्वयंपाकघरासाठी स्वतंत्र इमारतींची गरज भासू लागली. पण शाळेला कुठलंही अनुदान नव्हतं आणि आनंदवनात पशांची चणचण होती. दरम्यान बाबांचं स्पाँडिलोसिसचं दुखणं एवढं बळावलं, की त्यांना इंग्लंडला जाऊन पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया करून घ्यावी लागली. शस्त्रक्रियेनंतर इंग्लंडवरून परतताना बाबा मुंबईला मुक्कामी होते. तिथे मुंबईच्या ‘पटेल-व्होलकार्ट प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीचे सी. ए. सरोश बाटलीवाला यांनी बाबांना आपल्या कंपनीचे चेअरमन ऑर्थर कॉन्वे यांच्या घरी येण्याविषयी विनंती केली. बाबा गमतीने त्यांना म्हणाले, ‘‘माझी ‘व्हिजिटिंग फी’ खूप जास्त आहे!’’ यावर बाटलीवाला बाबांना म्हणाले, ‘‘आम्हाला मान्य आहे. पण आपण यावे.’’ तो दिवस होता ३० डिसेंबर १९७१. भेटीदरम्यान बाबांनी कॉन्वे यांच्यापुढे अंधशाळेच्या प्रस्तावित बांधकामाची समूळ योजनाच सादर केली. त्यांनी आनंदाने यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन बाबांना दिलं. दोन महिन्यांतच ५०,००० रुपयांचं योगदान ‘व्होलकार्ट फाऊंडेशन’कडून प्राप्त झालं आणि प्रकाशाच्या शाळेची नवी, डौलदार इमारत आनंदवनात उभी राहिली!

‘कुष्ठरुग्णांनी स्वत:च्या दु:खावर विजय मिळवून अंधांसाठी निवासी शाळा सुरू करणं’ हे जगातील ‘एकमेव’ उदाहरण तेव्हाही होतं आणि आजही आहे!

vikasamte@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 4:58 am

Web Title: baba amte anandwan school for visually impaired
Next Stories
1 ऑर्थर आणि संधीनिकेतन!
2 आनंद निकेतन महाविद्यालय
3 आनंदवनचे दूत
Just Now!
X