बदलापूर शहराने अवघ्या काही वर्षांत सांस्कृतिक शहर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून हे शहर नेहमीच चर्चेत राहिले. मात्र, शहराचा विकास चहुबाजूंनी होत असला तरी शहराच्या सांस्कृतिक अपेक्षा पूर्ण करणारे एक साधे नाटय़गृहही बदलापूरमध्ये नाही. येथे नाटय़गृह उभारण्यास नगरपालिका प्रशासनाने कायमच उदासीनता दाखविली आहे. त्यामुळे रंगभूमीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य बदलापूरकरांना ‘कुणी नाटय़गृह देता का नाटय़गृह’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
बदलापूर पालिकेने ७ एप्रिल २०१२ रोजी नाटय़गृहाच्या निर्मितीसाठी सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केला होता. पालिकेच्या मंजूर विकास योजनेमध्ये आरक्षण क्र. १८ अन्वये स्टेडियमसाठी जागा राखीव करण्यात आली असून त्याचा सात-बारा उतारादेखील पालिकेच्या नावे झालेला आहे. परंतु त्यावर कोणतीही हालचाल न झाल्याने हा विषय गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित होता. या नाटय़गृहाचा खर्च जवळपास १७ कोटींच्या घरात असल्याने आधीच एमएमआरडीएचा दरमहा १ कोटी हप्ता भरणाऱ्या आणि डबघाईला आलेल्या या पालिकेला ते शक्य नाही. त्यामुळे २५ जुलै २०१४ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत येथील सदस्य व पालिकेचे नगरसेवक श्रीधर पाटील यांनी पालिकेच्या वतीने मागणी केली असून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हा खर्च करण्यात यावा, असा मुद्दा मांडला आहे. यावर जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांनी बदलापूर पालिकेकडे बंदिस्त नाटय़गृह बांधण्यासंदर्भातला प्रस्ताव मागितला आहे. हा प्रस्ताव बदलापूर पालिका लवकरच सादर करणार असल्याचे समजते.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या मागणीचा पाटील यांनी पुनरुच्चार केला आहे. त्यावर पालकमंत्र्यांनी नाटय़गृहाचा प्रश्न मार्गी लावू, असे म्हटले आहे. मात्र, ही बदलापूर पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर ही पोकळ घोषणा ठरू नये इतकीच अपेक्षा आहे.

बदलापूरकरांची सांस्कृतिक व्यथा
’ नाटक बघण्यासाठी येथील रसिकांना कल्याण, डोंबिवली, ठाणे येथे प्रवास करून जावे लागतो.
’बदलापुरातील काहींनी स्वत:ची नाटके तयार करून प्रदर्शितदेखील केली आहेत. परंतु त्यांना त्यांच्या राहत्या शहरात नाटकांचे प्रयोग करता आलेले नाहीत.
’अंबरनाथ पालिकेनेही स्वत:चे नाटय़गृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.  मात्र, बदलापूरमध्ये नाटय़गृह उभारण्याबाबत ठराव होऊन तीन वर्षे लोटल्यानंतरही अजून त्याचे काम सुरू झालेले नाही.
संकेत सबनीस, बदलापूर