ठाण्यात सध्या करोना समूह संसर्ग नाही; सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये मृत्यूचे प्रमाणही कमी

ठाणे : ठाणे महापालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील करोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविले असून त्यानंतरही रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागल्याने प्रशासकीय प्रयत्नांना यश मिळू लागले आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा, घोडबंदर यांसारख्या भागांत दररोज साडेपाच हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण अधिक असले तरी नियमित चाचण्यांचे प्रमाणही आहे त्यापेक्षा वाढविण्याचे लक्ष्य आखण्यात आले आहे. चाचण्या वाढवूनही रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ठाणे महापालिकेचे कौतुक केले आहे.

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी असल्याचे दिसून येत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ४५ हजार ७३० करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४२ हजार २३२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर २ हजार १६१ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत १ हजार १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून दररोज साडेपाच हजारांहून अधिक करोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यामध्ये सुरुवातीला चारशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. गेल्या काही दिवसांपासून दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे शहरात करोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे.

करोना रुग्ण आढळून येण्याचे आठवडाभराचे सरासरी प्रमाण ०.५१ टक्के आहे, तर गेल्या पंधरा दिवसांपासून दररोज रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण चार टक्क्यांपेक्षा कमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार सलग पंधरा दिवस करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर शहरात समूह संसर्ग असतो. तर सलग पंधरा दिवस रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असेल तर शहरात समूह संसर्ग नसतो. या निकषानुसार शहरात सध्या समूह संसर्ग नाही, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

कल्याण-डोंबिवलीतही रुग्णसंख्या आटोक्यात

सुरुवातीपासूनच करोनाचे केंद्र राहिलेल्या कल्याण-डोंबिवली शहरातही रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली आहे. या शहरांमध्ये २४०० ते २५०० पर्यंत चाचण्या केल्या जात आहेत. असे असूनही तिथेही रुग्णांचा आकडा २५० पेक्षा कमी झाला आहे. मागील सहा महिन्यांत प्रथमच कल्याण-डोंबिवलीत रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागल्याने स्थानिक प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

शहरातील मृत्युदर

महिना     मृत्यू         मृत्युदर

एप्रिल      १७            ५.७० टक्के

मे           १६१            ५.९१ टक्के

जून        ३१५           ५.४९ टक्के

जुलै       २५७           २.३५ टक्के

ऑगस्ट  १६१           २.५९ टक्के

सप्टेंबर  १३०          १.२० टक्के

ऑक्टो.    ८९          १.०३ टक्के

(मृत्युदर टक्केवारीत)

चाचण्यांची संख्या

महिना       चाचण्या दररोज   सरासरी चाचण्या

एप्रिल           ४५१४                      १९३

मे                १५,७६०                   ५२५

जून            २४,८५४                    ८२८

जुलै            ४९,३२७                   १५९१

ऑगस्ट       ७१,२७३                   २३००

सप्टेंबर       १,५९,५५३                ५३१८

ऑक्टो.       १,३९,८४५                 ५५९४

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाइन चर्चा केली. रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याबद्दल महापालिकेच्या प्रयत्नांचे कौतुक केले. रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी चाचणी केंद्र सुरू करून पालिकेने करोनाचा प्रसार रोखण्यासाठी धाडसी पाऊल उचलले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

– नरेश म्हस्के, महापौर, ठाणे