नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात वाहतूककोंडीचे संकट; उड्डाणपुलाच्या दुरुस्तीकामांमुळे वाहतुकीवर परिणाम

किशोर कोकणे

पूर्व द्रुतगती महामार्गावरील नितीन कंपनी उड्डाणपुलावर राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीस) रस्तेदुरुस्तीचे काम येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहे. या उड्डाणपुलावर महामंडळाकडून या कामासाठी यंत्र ठेवले जाणार आहे. त्यामुळे उड्डाणपुलावरील मार्ग एकेरी होणार असून याचा परिणाम या मार्गावरील वाहतुकीवर होईल हे स्पष्ट आहे. मेट्रोच्या कामामुळे तीनहात नाका ते घोडबंदरदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी वाहनकोंडी होत असते. नितीन कंपनी उड्डाणपुलावरील वाहतूक एकेरी झाल्यास पुर्व द्रुतगती महामार्ग किमान महिनाभर कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.

पूर्व द्रुतगती महामार्ग हा मुंबईहून ठाणे किंवा नाशिकच्या दिशेने ये-जा करणाऱ्या वाहनांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरून दिवसाला लाखो वाहने मुंबईच्या दिशेने ये-जा करतात. गेल्या दोन वर्षांपासून या मार्गावर मेट्रो निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे महामार्गावरील सेवा रस्ते आणि मुख्य मार्गाचा भाग मेट्रोच्या अडथळ्यांमुळे अरुंद झाला आहे. तसेच करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसामान्यांना उपनगरीय रेल्वेत प्रवास करण्यास बंदी आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांचा मोठा भार वाढला आहे. मेट्रोची कामे, अरुंद रस्ते आणि वाहनांचा वाढलेला भार यामुळे दररोज या मार्गावर वाहतूककोंडी होत आहे. त्यात आता नितीन कंपनी उड्डाणपुलावरील रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एमएसआरडीसीकडून येत्या दोन ते तीन दिवसांत सुरू होण्याची शक्यता आहे.

उड्डाणपुलाच्या दोन्ही मार्गावर महिनाभर टप्प्याटप्प्याने हे काम करण्यात येणार असल्याचे एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अभियंत्याने सांगितले. त्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक एकेरी सोडावी लागणार आहे. याचा परिणाम ठाणे, मुंबई, घोडबंदर मार्गावरील वाहतुकीवर होईल अशी चिन्हे आहेत.

कामाचे स्वरूप

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर सुरुवातीच्या टप्प्यात हे काम केले जाणार आहे. दुरुस्तीसाठी एमएसआरडीसीला त्यांचे यंत्र (कुकर) उड्डाणपुलावर ठेवावे लागणार आहे. हे यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलविता येत नाही. त्यामुळे काम पूर्ण होई पर्यंत हे यंत्र भर रस्त्यातच असणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक एकेरी पद्धतीने करावी लागणार आहे. मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ठाण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम करावे लागणार आहे. या मार्गावरही अशाच पद्धतीने काम सुरू राहील.

दोन दिवसांपूर्वी चाचपणी

उपनगरीय रेल्वे सेवा सामान्यांसाठी सुरू झाल्यानंतर हे काम सुरू करण्याची विनंती वाहतूक पोलिसांनी एमएसआरडीसीला केली होती. तसेच एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी बोलावून एकेरी मार्गिका केल्यास कुठपर्यंत वाहतूककोंडी होते हे प्रत्यक्षात दाखवून दिले होते. यावेळी अवघ्या पंधरा मिनिटात मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहतूककोंडी झाली होती. मात्र त्यानंतरही एमएसआरडीसी काम करण्यावर ठाम आहे.

परिणाम काय?

या मार्गावर एखादे वाहन बंद पडल्यास अवघ्या १५ मिनिटांत वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी दोन ते तीन तास लागत असतात. मात्र, आता महिनाभर हे यंत्र याच मार्गावर असल्याने रात्री मुंबईपर्यंत ही कोंडी होणार आहे. तसेच ही कोंडी टाळण्यासाठी वाहने कोपरी, नौपाडा मार्गे अंतर्गत मार्गाचा वापर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत मार्गही वाहतूक कोंडीग्रस्त होण्याची शक्यता आहे.