23 August 2019

News Flash

पंचनामे २४ तासांत पूर्ण करा!

जिल्ह्य़ातील पूरस्थितीबाबत पालकमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

जिल्ह्य़ातील पूरस्थितीबाबत पालकमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

जिल्ह्य़ात जुलैमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचे पंचनामे १५ ऑगस्टपूर्वी करावे, असे निर्देश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. पूरस्थिती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी पडू देऊ नका, असेही त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना सूचित केले. नदी आणि खाडीकिनारी नव्याने कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी आणि संबंधित विभागाने दर महिन्याला त्यांच्या कार्यक्षेत्रातील बेकायदा बांधकामाचा आढावा घ्यावा आणि त्याचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करावा, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्य़ातील अतिवृष्टीमुळे बाधित भागातील स्थितीचा आढावा आणि उपाययोजनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे, सहायक जिल्हाधिकारी सौरभ कटियार, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक दिवे, अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील व जिल्ह्य़ातील सर्व उप जिल्हाधिकारी, तहसीलदार, विविध विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

पूरस्थितीमुळे ज्या लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे, त्यांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना, रमाई, शबरी यांसारख्या विविध योजनांच्या माध्यमातून हक्काचे घर देण्यात यावे, असे पालकमंत्र्यांनी सूचित केले. वसई, नालासोपारा भागांत वारंवार रस्ते पाण्याखाली जात असल्याने त्यासंबंधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश वसई-विरार पालिकेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले.

तलासरी-डहाणू परिसरात भूकंपबाधित लोकांच्या निवासाबाबतही पालकमंत्र्यांनी या बैठकीत चर्चा केली. तसेच कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, महापालिका आणि नगर परिषद या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. जिल्हा परिषदेने शाळांची दुरुस्ती करावी. पुराचे पाणी विहिरीमध्ये जाऊन पाणी दूषित असण्याची शक्यता पाहता पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी विहिरींतील पाणी स्वच्छ करण्याच्या उपाययोजना कराव्यात, लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांची शक्यता लक्षात घेऊन औषधांचे वाटप करावे, पूरस्थितीत नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्यांना शासनाची मदत तात्काळ द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.

ग्रामीण भागातील वाहतूक सुरू

जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे विशेषत: जव्हार भागातील काही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. या परिसरातील रस्त्यांची पाहणी करून आढावा घेतला. बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. वाडा-मलवाडा-साखरा रस्त्यावरील मलवाडा गावाजवळील पिंजाळ नदीवरील पुलाचा मलवाडा गावाच्या बाजूचा भराव वाहून गेला होता. तात्पुरत्या स्वरूपात मातीच्या भरावास उतारा देऊन हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरित भरावाचे काम पूर्ण करून सात दिवसांत मोठय़ा वाहनांसाठी रस्ता खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. जव्हार-विक्रमगड रस्त्यावरील साखरा येथील नवीन पुलाच्या भरावाचे काम पूर्ण करून एकमार्गी वाहतुकीस रस्ता सुरू करण्यात आला आहे. तर याच मार्गावर चार ते पाच ठिकाणी रस्ता खचून तडे गेल्याने जव्हार बाह्य़वळण रस्ता बंद करण्यात आला होता, त्या ठिकाणी भराव करून रस्ता वाहतकीस खुला करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

First Published on August 14, 2019 12:48 am

Web Title: heavy rain maharashtra flood ravindra chavan mpg 94