कागदपत्रे नसल्याने सात वाहनांवर कारवाई

शहर स्वच्छतेचा डंका पिटत ठाणे महापालिकेमार्फत चालविल्या जाणाऱ्या घंटागाडय़ांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याची ओरड सातत्याने सुरू असताना प्रादेशिक परिवहन विभागाने कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे नसलेल्या सात घंटागाडय़ांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या घंटागाडय़ा कोणत्याही ठोस परवाने तसेच कागदपत्राविना चालविल्या जात होत्या, अशी माहिती प्रादेशिक परिवहन विभागातील सूत्रांनी दिली. तसेच वाहनांमधून प्रदूषण होऊ नये यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रेही चालकांकडे आढळून आली नाहीत.

ठाणे शहरातील बहुतांश कचरा हा घंटागाडय़ांमार्फत उचलण्यात येतो. कचरा वाहतूक आणि सफाईची शहरातील यंत्रणा अत्यंत सदोष असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे आल्या असताना महापालिकेच्या घनकचरा विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असते. विशेष म्हणजे, ज्या माध्यमातून या कचऱ्याची वाहतूक होते त्या घंटागाडय़ांची दुरवस्था झाल्याच्या तक्रारी यापूर्वीही पुढे आल्या आहेत. काही गाडय़ा मोडकळीस आल्या आहेत. मात्र, पालिका प्रशासनाने घंटागाडय़ांच्या नियोजनाची जबाबदारी ठेकेदारांवर सोपवून स्वत:चे हात झटकल्याचे दिसून येत होते. या पाश्र्वभूमीवर ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाने महापालिकेच्या घंटागाडय़ांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाई केलेल्या गाडय़ाच्या ठेकेदारांना आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही तर या गाडय़ांना बाद शेरा देण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. याविषयी महानगरपालिकेच्या घनकचरा विभाग अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांना वारंवार संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.

ठाणे महापालिकेच्या घंटागाडय़ांची दुरवस्था पाहता अखेर आम्ही कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत सात गाडय़ांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून ठाणे शहरातील सर्व घंटागाडय़ांची तपासणी केली जाणार आहे. घंटागाडय़ांची कागदपत्र उपलब्ध नसल्यास त्यांच्या विरोधात ठोस पावले उचलली जातील.    – नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, ठाणे