जिल्ह्य़ात मंगळवारी दिवसभरामध्ये १ हजार ३४० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा आता ४५ हजार २६६ वर पोहोचला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या पंधरवडय़ापासून  कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून परिस्थिती चिंताजनक बनू लागली आहे. मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ४५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या १ हजार ३५३ वर पोहोचली आहे.

मंगळवारी नोंदल्या गेलेल्या रुग्णांत कल्याण-डोंबिवली शहरातील ३८१, ठाणे शहरातील २९६, मीरा- भाईंदरमधील १६२, ठाणे ग्रामीणमधील १२४, उल्हासनगरमधील ११९, नवी मुंबईतील ११५, बदलापूर शहरातील ६२, अंबरनाथ शहरातील ५१ आणि भिवंडीतील ३० रुग्णांचा समावेश आहे.

कल्याण-डोंबिवलीतील करोना रुग्णसंख्या रोज सरासरी ३०० ते ३५०चा टप्पा ओलांडत आहे. गेल्या १३ दिवसांपासून कल्याण डोंबिवलीत ५ हजार ६८८ नवे रुग्ण आढळले आहे. तर, याच कालावधीत शहरामध्ये ६६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहेत.

मंगळवारी जिल्ह्य़ात तब्बल ४५ जणांचा करोनामुळे मृत्यु झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील १६, नवी मुंबईतील ८, कल्याण डोंबिवलीतील ७, ठाणे ग्रामीणमधील ५, मीरा भाईंदरमधील ४, अंबरनामधील ३ तर उल्हासनगर आणि बदलापूरमधील प्रत्येकी एकारुग्णाचा समावेश आहे.