ठाण्यातील डॉक्टर, परिचारिकांनाच प्राधान्य
ठाणे : करोना टाळेबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने आत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महापालिकेच्या बस गाडय़ा टिटवाळा, अंबिवलीपर्यंत धावत आहेत. मात्र, या बसगाडय़ांवर कार्यरत असलेले काही मुजोर चालक-वाहक केवळ ठाणे शहरात कार्यरत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी गाडय़ांमध्ये प्रवेश देत आहेत. मुंबईसह इतर शहरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अधिकृत ओळखपत्र दाखवले तरी हे चालक-वाहक अतिशय आर्वाच्य भाषेत या आरोग्य कर्मचाऱ्यांना बसमधून खाली उतरवत असल्याच्या तक्रारी आता पुढे येत आहेत. त्यामुळे टिटवाळा, अंबिवली आणि कल्याण शहरातून मुंबई, उल्हासनगर आणि बदलापूर भागात काम करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत.
ठाणे महापालिका परिवहन प्रशासनाने शहाड, अंबिवली, टिटवाळा परिसरात राहणाऱ्या आणि मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी विशेष बस सोडल्या आहेत. या बसवर कार्यरत असलेले काही मुजोर चालक-वाहक ठाणे शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारत आहेत. या कर्मचाऱ्यांनी त्यांचे ओळखपत्र दाखवले तरीही चालक-वाहक त्यांच्याशी अर्वाच्य भाषेत बोलून त्यांना बसमधून खाली उतरवत आहेत. त्यामुळे ठाणे शहराव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रचंड हाल होत असून त्यांना रुग्णालय गाठण्यास उशीर होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याने ठाणे शहरातून टिटवाळा, कसारा या दिशेला जाणाऱ्या बसचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे या भागात राहणारे कर्मचारी ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या बसकडे वळले आहेत. मात्र चालक-वाहकांच्या असभ्य वर्तनामुळे डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ठाणे परिवहन सेवेने टाळेबंदीच्या काळात सोडलेल्या विशेष गाडय़ांमधून मुंबई-ठाण्यासह इतर उपनगरांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा आहे, असे मत ठाणे महापालिका परिवहन सेवेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
‘केडीएमसी’ची सेवा कल्याणमधील कर्मचाऱ्यांसाठीच
डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही त्यांची बससेवा टिटवाळा, अंबिवलीपर्यंत सुरू केली आहे. बेस्ट प्रशासनाप्रमाणे केवळ कल्याण-डोंबिवली शहरामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या गाडय़ांमध्ये प्रवेश द्यावा, असा आदेश परिवहन प्रशासनाने सुरुवातीलाच काढला आहे. गेल्या चार दिवसांपासून राज्य परिवहन सेवेच्या बसचे प्रमाण कमी झाल्याने टिटवाळा, अंबिवली आणि शहाड परिसरात राहणारे आणि बदलापूर उल्हासनगर, ठाणे शहरात कार्यरत असलेले डॉक्टर आणि कर्मचारी केडीएमटीकडे वळू लागले आहेत. मात्र, आदेशानुसार केडीएमटीचे चालक वाहक आरोग्य कर्मचाऱ्यांना बसमध्ये प्रवेश नाकारत आहेत. त्यामुळे वेळेवर रुग्णालये गाठायची कशी, असा प्रश्न आता या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.