औद्योगिक, खासगी, दुकान संकुल आस्थापनांमधील प्रत्येक कर्मचारी, कामगारांना करोना चाचणी सक्तीची केली आहे. ही चाचणी करून घेतल्याशिवाय अनेक आस्थापना कामगारांना आपल्या कार्यालयांमध्ये प्रवेश देत नाहीत. त्यामुळे कामगारांनी मोफत करोना चाचणी करून घेण्यासाठी पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातील चाचणी केंद्राबाहेर रांगा लावल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून दररोज ४०० ते ५०० कामगार चाचणी करण्यासाठी येत आहेत, असे रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या रुग्णांना ताप, सर्दी, खोकला आणि इतर लक्षणे आहेत ते रुग्ण पण करोना चाचणी करण्यासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात येत आहेत. या रुग्णालयात मोफत चाचणी करून मिळत असल्याने कामगार, चाळ, झोपडपट्टी विभागातील अधिकाधिक रहिवाशी या ठिकाणी दररोज येत आहेत. यापूर्वी फक्त आजाराची लक्षणे असलेले रुग्ण करोना चाचणी करण्यासाठी रांगेत असत. आता या रांगेत चाचणी करून घेण्यासाठी एमआयडीसी, खासगी कंपन्या, आस्थापनांमधील कर्मचारी, कामगार उभे राहात असल्याने ही रांग एक ते दोन कि.मी.पर्यंत जात आहे. सकाळी ९ पासून ते संध्याकाळी ८ पर्यंत कामगार रांगेत असतात. एकूण ३०० ते ३५० रुग्णांची करोना चाचणी करून घेण्याची केंद्राची क्षमता आहे. दिवसभरात या रुग्णांच्या चाचण्या घेऊन त्या पुढील प्रक्रियेसाठी मुंबई किंवा पुणे येथे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था येथे पाठवाव्या लागतात. एका वेळी पाठविलेले करोना चाचणी अहवाल मिळण्यासाठी यापूर्वी दोन दिवस लागत होते. आता चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढल्याने अहवाल मिळण्यास चार ते पाच दिवस लागत आहेत. तोपर्यंत खरा करोनाचा रुग्ण असतो त्याचाही अहवाल या चाचणी अहवालात खोळंबून राहतो. अशा रुग्णाच्या हातात करोना चाचणीचा अहवाल नसल्याने त्याला कोणतेही रुग्णालय दाखल करून घेत नाही, अशी माहिती एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली. कामगारांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याची सक्ती करण्याऐवजी त्यांनी प्रतिजन चाचणी केली तरी चालणार आहे. तो अहवालही ग्राह््य धरला जाईल, असे आस्थापनांनी मान्य करणे आवश्यक आहे. परंतु आस्थापनांचा शासकीय आदेशाप्रमाणे आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचा आग्रह कायम असल्याने कामगार, कर्मचारी कामाला दांडी मारून चाचणी करुन घेण्यासाठी रुग्णालय, चाचणी केंद्रांसमोर रांगा लावून उभे असतात. रुक्मिणीबाई रुग्णालयात मोफत प्रतिजन आणि आरटीपीसीआर चाचणी करून मिळत असल्याने काही रुग्ण, कामगार प्रतिजन आणि करोना चाचणी करून घेत आहेत. यामध्ये चाचणी केंद्रांतील कर्मचाऱ्यांचा वेळ जातो, असे अधिकारी म्हणाला. कामगारांनी प्रतिजन करून घेण्याचा आग्रह आस्थापनांनी केला तर कामगार सकाळपासून उशिरापर्यंत चाचणी करून घेण्यासाठी जे उभे असतात ते प्रमाण कमी होईल, असे अधिकारी म्हणाला.

चाचणी केंद्रांसाठी प्रयत्नशील

डोंबिवली एमआयडीसीत एक लाख कामगार काम करतात. सध्या ५० टक्के क्षमतेने कंपन्या चालविल्या जात आहेत. तरी ५० हजार कामगार विविध कंपन्यांमध्ये दररोज काम करीत आहेत. शासन आदेशाप्रमाणे या कामगारांना आरटीपीसीआर चाचणी सक्तीची केली आहे. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी प्रवेश देऊ नये असे निर्देश आहेत. त्यामुळे खासगी कंपन्या कामगारांना आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी आग्रही आहेत. आरटीपीसीआर करोना चाचणी करून घेण्याची केंद्र कमी प्रमाणात आहेत. अनेक कामगार मोफत सुविधा पालिकेत मिळते म्हणून पालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयात जात आहेत. अनेकांची ६०० रुपये देऊन चाचणी करून घेण्याची ऐपत नसते ते या सुविधेचा लाभ घेतात. काहींना कामावर गैरहजर राहून चाचणी करावी लागते. त्यांचा त्या दिवसाचा रोजगार बुडतो. त्यामुळे कामगारांना करोना चाचणी सक्तीची न करता त्यांना प्रतिजन चाचणी करून देण्याची मुभा द्यावी. औद्योगिक क्षेत्रात कामगारांच्या सोयीप्रमाणे करोना चाचणी केंद्र सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, असे पत्र एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे, असे कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी सांगितले. एमआयडीसीतील कामगारांना करोनाची लस घेण्यासाठी औद्योगिक क्षेत्रात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कामाचे सभागृह उपलब्ध करुन देण्याची तयारी कामा संघटनेने दर्शविली आहे. याशिवाय डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील घरडा रुग्णालयात लसीकरण केंद्राची सुविधा आहे. ज्या कंपनीत ४५हून अधिक वयोगटांतील १०० पेक्षा अधिक कामगार असतील त्या कंपन्यांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावीत. जेणेकरून तेथील कामगारांना स्थानिक भागातच लस मिळेल. त्यांची परवड होणार नाही, असे एमआयडीसीला सूचित केले आहे. अशा कंपन्या किती आहेत याची माहिती जमा केली जात आहे.

साथ आजाराची लक्षणे दिसत असलेले रुग्ण आणि विविध आस्थापनांमधील कामगार करोना चाचणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात येत आहेत. या ठिकाणी मोफत सेवा मिळते. चाचणी करून घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने या वाढत्या भारामुळे चाचणी अहवाल मिळण्यास विलंब होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी औद्योगिक ठिकाण, रिक्षा वाहनतळ अशा ठिकाणी करोना चाचणी शिबीर घेतली जात आहेत.

– डॉ. प्रज्ञा टिके, मुख्य वैद्यकीय अधिकारी, रुक्मिणीबाई रुग्णालय

कामगारांना करोना चाचणी सक्तीची केल्याने औद्योगिक क्षेत्रात चाचणी आणि लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी एमआयडीसीच्या वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. परवानगी मिळाली की त्याप्रमाणे एमआयडीसी, पालिकेच्या सहकार्याने नियोजन केले जाईल. कामगारांची चाचणीसाठी परवड होणार नाही.

– देवेन सोनी, अध्यक्ष, कामा