उल्हास, कामवारी, काळू, वालधुनी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी पाण्याखाली गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नद्यांना पूर आला असून त्याचा मोठा फटका शहरी भागासह ग्रामीण भागालाही बसला. उल्हास नदीला पूर आल्याने बदलापूर, उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. या पुरामुळे या शहरांमध्ये जनजीवन विस्कळीत होऊन हाहाकार उडाला. भिवंडी शहरातही कामवारी नदीला पूर येऊन पाणी लोकवस्तीत शिरले. जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतही पुराने थमान घातले.

कल्याण/ ठाणे/ शहापूर : गेल्या तीन-चार दिवसांपासून अविरत सुरू असलेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासून रौद्र रूप धारण केल्याने ठाणे जिल्ह्याती बहुतांश नद्या, नाले तुडूंब भरून वाहू लागले आहेत. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या भागांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाऊस आणि ओसंडून वाहू लागलेल्या नद्यांमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. भिवंडीत कामवारी नदीला पूर येऊन पाणी लोकवस्तीत शिरले. परिणामी शहरातील सर्व रस्त्यांना नद्यांचे रूप आले होते. कल्याणमध्ये वालधुनी आणि उल्हास नद्यांची पातळी वाढून कल्याण ग्रामीण, टिटवाळा, शहाड, कल्याण पूर्व परिसराला फटका बसला  तर ग्रामीण भागातील पावसामुळे शहापूर तालुक्यातील दीडशे गावांशी संपर्क तुटला.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
three thousand families staying near waldhuni river boycotting lok sabha election, construction within river bed
कल्याणमध्ये वालधुनी नदी परिसरातील तीन हजार कुटुंबीयांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

उल्हास नदीच्या पट्टय़ात मुसळधार पावसामुळे उल्हास नदीचे पाणी लोकवस्त्यांमध्ये शिरल्याने अनेक कुटुंबांना घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला. अनेक भागांतील इमारतींच्या पहिल्या मजल्यांपर्यंत पाण्याची पातळी चढली होती. त्यामुळे इमारतीतील रहिवाशांशी संपर्क तुटला. रस्त्यावर, इमारतींच्या आवारात उभी असलेली वाहने बुडून मोठे नुकसान झाले. सायंकाळी उशिरापर्यंत येथील पूरस्थिती कायम होती. कल्याण पूर्वेकडील अशोकनगर, वालधुनी, हनुमाननगर, आंबेडकर नगर, विठ्ठलवाडी, चिंचपाडा तर पश्चिमेकडील गांधारे, बारावे, मोहिली, मोहने, आंबिवली, बैलबाजार, दुर्गाडी परिसर पूर्णपणे जलमय झाले होते. गुरुवारी दिवसभर दूध तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा उपलब्ध होत नसल्यामुळे रहिवाशांचे हाल झाले. कल्याण बाजारसमितीच्या आवारातही पाणी शिरल्याने येथील व्यवहार ठप्प झाले.

टिटवाळा भागातील काळू नदीला पूर आल्यामुळे टिटवाळा, मांडा, रिजन्सी गृहसंकुल भागांत चार ते पाच फूट  इतकी पाण्याची पातळी तयार झाली होती. सकाळी दहा वाजता नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागल्यानंतर पालिकेच्या आपात्कालिन पथकांनी धाव घेऊन अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यास सुरुवात केली.

पावसाचा मोठा फटका भिवंडी शहर आणि ग्रामीण भागालाही बसला. दोन दिवसांपासूनच्या पावसामुळे कामवारी नदीला पूर येऊन भिवंडी शहर पाण्याखाली गेले. पडघ्यात तर पाण्याची पातळी वाढू लागल्यामुळे रहिवाशांनी घरांच्या छतांवर आसरा घेतला. शहरातील दोन हजारांहून अधिक नागरिकांचे दिवसभरात स्थलांतर करण्यात आले. भिवंडी येथील टाटा आमंत्रा या उच्चभ्रू गृहसंकुलातही चार-पाच फुट उंचीवर पाणी साचले होते. येथे २०० नागरिक पुरात अडकून पडले होते. मात्र, दुपारी उशिरापर्यंत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवणे किंवा त्यांची सुटका करण्याचे काम सुरू झाले नव्हते, असे येथील रहिवासी अश्रफ शेख यांनी सांगितले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शहापूर तालुक्याला सर्वाधिक फटका बसला. या तालुक्यातील तानसा, मोडकसागर धरणे वाहू लागल्यामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेले.  तालुक्यातील अल्याणी-नांदवळ गावात काळू नदीचे पाणी शिरल्याने अनेक घरे पाण्याखाली गेली. शहापूरला जोडणाऱ्या सापगाव येथील पुलावरून भातसा नदीचे पाणी गेल्याने या पुलावरील रस्ता पूर्णत: उखडला. सुरक्षितता म्हणून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली असल्याने पुला पलीकडील शेणवा, डोळखांब, किन्हवली व मुरबाड रस्त्यावरील सुमारे १५० गावांचा शहापूरशी संपर्क तुटला.

कामवारी नदीला पूर आल्याने भिवंडी शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.  (छायाचित्रे : दीपक जोशी)