ठाण्यात शनिवारी केलेल्या पालिका अधिकाऱ्यांच्या बदल्या ४८ तासांत रद्द

ठाणे : धडाकेबाज निर्णय घेताना राजकारण्यांना विश्वासात न घेतल्याबद्दल वेळोवेळी वादात सापडणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर ४८ तासांपूर्वी घेतलेला निर्णय मागे घेण्याची नामुष्की सोमवारी ओढवली. ठाणे महापालिका प्रशासनाने केलेल्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांवर राज्याचे नगरविकास मंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर प्रशासनाने शनिवारी सायंकाळी काढलेले बदल्यांचे आदेश सोमवारी दुपारी मागे घेण्यात आले.  शिक्षण विभागाचे वादग्रस्त उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडे काही महत्त्वाची खाती सोपवून जयस्वाल यांनी सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

ठाणे महापालिकेतील चार उपायुक्तांसह पाच सहायक आयुक्तांची शनिवारी बदली करण्यात आली होती. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी तसे लेखी आदेश काढले होते. या बदल्यांमध्ये उपायुक्त मनीष जोशी, अशोक बुरपुल्ले, संदीप माळवी आणि वर्षां दीक्षित तर सहायक आयुक्त मारुती गायकवाड, शंकर पाटोळे, प्रणाली घोंगे, महेश आहेर आणि विजय जाधव यांचा समावेश होता. शिक्षण विभागाच्या कारभारावरून उपायुक्त मनीष जोशी हे सातत्याने टीकेचे धनी ठरत आहेत. जोशी यांच्या कार्यकाळात मांडण्यात आलेले शिक्षण विभागाचे काही प्रस्ताव वादग्रस्त ठरले होते. असे असताना जोशी यांच्याकडून शिक्षण विभागाचा कार्यभार काढून घेताना त्यांच्याकडे घनकचरा विभाग, घनकचरा प्रकल्प, महापालिका सचिव (अतिरिक्त कार्यभार) अशा महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी सोपविण्यात आल्याने शनिवारी महापालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते. जोशी यांच्या एकंदर कार्यपद्धतीविषयी महापालिका वर्तुळात फारसे समाधानकारक वातावरण नाही. असे असताना त्यांना महत्त्वाची खाती देऊन जयस्वाल यांनी नेमके काय साधले असा सवालही उपस्थित केला जात होता. या बदल्यांविषयी महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटताच पालकमंत्री एकनाथ िशदे यांनीदेखील नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी जयस्वाल यांना या बदल्यांना स्थगिती देण्याच्या तोंडी सूचनाही केल्याचे समजते. त्यानुसार सोमवारी या बदल्या रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

उन्हाळे यांच्यावर अधिकारी नाराज

शनिवारी बदल्यांचे आदेश काढताच महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठरवून डावलण्यात आल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. अतिरीक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी हे आदेश काढताच काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तोंडसुख घेतल्याची चर्चा होती. उन्हाळे यांच्या कार्यपद्धतीविषयी महापालिका वर्तुळात कायमस्वरुपी अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सुर आहे. ही नाराजी यानिमीत्ताने जाहीरपणे पुढे आल्याचे बोलले जाते.

प्रशासकीय कारण

महापालिकेतील उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्यांच्या आदेशामध्ये १७ फेब्रुवारी म्हणजेच सोमवारपासून पदभार स्वीकारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या बदल्यांना स्थगिती देण्याचे तोंडी आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले होते. त्यामुळे पदभार स्वीकारायचा की नाही, याबाबत अधिकाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण होते आणि यातूनच अधिकाऱ्यांनी सोमवार दुपापर्यंत पदभार स्वीकारला नव्हता. अखेर दुपारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी नवीन आदेश काढला. त्यामध्ये प्रशासकीय कारणास्तव बदल्या रद्द करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.