कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये करोना झालेल्या, करोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस हा विकार होत आहे. अशा प्रकारचे सहा रुग्ण विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यामधील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी दिली.

करोनाचे उपचार सुरू असलेल्या ‘एम्स’ रुग्णालयातील काही रुग्णांच्या डोळ्यांना म्युकरमायकोसिस विकार झाला आहे. अशा रुग्णांवर करोनाच्या उपचाराबरोबर डोळ्याच्या विकारावरही एकाच वेळी उपचार करावे लागत आहेत. म्युकरमायकोसिसचा अटकाव करण्यासाठी कान-घसा-नाकतज्ज्ञ, ऑप्थोल्मोलॉजिस असे १० तज्ज्ञ डॉक्टरांचे स्वतंत्र पथक उपचारासाठी स्थापन केले आहे. करोनाबाधित किंवा त्यामधून बरे होत असलेल्या रुग्णांना डोळ्यांचा विकार जडत असल्याने त्याचा उपचार करताना स्वतंत्र अभ्यासतज्ज्ञ डॉक्टरांकडून अभ्यास केला जात आहे. या आजारावरील उपचाराची पद्धती रुग्णालयाने निश्चित केली आहे, असे डोंबिवली एमआयडीसीतील एशियन इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेस रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी सांगितले. मंगळवारी डोंबिवली, कल्याण (म्हारळ) मध्ये दोन म्युकरमायकोसिसची बाधा झालेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.

ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिसचा रुग्ण

ठाणे : ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बाधित महिला ५५ वर्षीय असून त्या पालघर भागात राहतात. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पालघर भागातील या महिलेला ५ मे रोजी करोनाची लागण झाली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचा उजवा डोळा लाल झाला होता. तसेच डोळ्याचीही हालचाल होत नव्हती. त्यामुळे रविवारी रात्री त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्या डोळ्यातील मास पेशींमध्ये सूज आढळून आली. त्यानंतर त्यांच्या चाचण्या केल्या असता त्यांना म्युकरमायकोसिस झाल्याचे आढळून आले. बाधित महिलेची साखरेची पातळी अनियंत्रित आहे. त्यांना उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर नसल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयातच उपचार सुरू आहेत, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.