ठाणे जिल्ह्यात निर्बंधांची कठोर अंमलबजावणी

ठाणे / कल्याण / बदलापूर : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने गुरुवार रात्रीपासून निर्बंध आणखी कठोर केले असून त्याच्या अंमलबजावणीसाठी ठाणे जिल्ह्य़ातील पोलीस, परिवहन उपक्रम, राज्य परिवहन सेवा, रेल्वे प्रशासन, महापालिका आणि जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाबंदीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहराच्या वेशीवरील आनंदनगर, घोडबंदर, मुरबाड, वांगणी आणि भिवंडीच्या सीमांवर पोलिसांची पथके नाकाबंदी करणार आहेत. तर, राज्य परिवहन सेवा आणि परिवहन उपक्रमांच्या बसगाडय़ा ५० टक्के क्षमतेने चालविण्यात येणार आहेत. तसेच ठाणे रेल्वे स्थानकामध्ये गुरुवारी सकाळपासूनच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर प्रवाशांना तिकिटे देण्यात येत नव्हती. त्यामुळे रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवत होते.

राज्य सरकारने गुरुवारी रात्रीपासून कठोर निर्बंध लागू केले असले तरी नागरिकांकडून त्यांचे नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा नागरिकांची शहरातील बस थांबे तसेच रेल्वे स्थानकात होणारी गर्दी कमी करण्यासाठी पोलीस, राज्य परिवहन सेवा आणि जिल्ह्य़ातील परिवहन उपक्रमाने नियोजन आखण्यास सुरुवात केली असून त्याची अंमलबजावणी शुक्रवार सकाळपासून केली जाणार आहे. ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांमध्ये शुक्रवार सकाळपासून सुमारे पाच हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. यापूर्वीच्या निर्बंधांमध्ये सार्वजनिक वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू होती. जिल्हाबंदीही नव्हती आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकानेही दिवसभर सुरू होती. यामुळे नागरिक खरेदीच्या निमित्ताने घराबाहेर पडत होते. मात्र, नव्या निर्बंधामध्ये जीवनावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांच्या वेळा आता ठरविण्यात आल्या असून सकाळी ७ ते ११ या वेळेत ही दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीच्या निमित्ताने नागरिकांना आता दुपारनंतर बाहेर फिरता येणार नाही.

जिल्ह्य़ाच्या सीमांवरही पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. या ठिकाणी खासगी वाहने अडवून त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. जिल्ह्य़ातील ठाणे, भिवंडी, कल्याण, नाशिकहून अनेक येणारी वाहने ही कोपरी आनंदनगर येथून मुंबई तसेच नवी मुंबईच्या दिशेने जातात. तर बोरिवली, वसई किंवा गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने घोडबंदर मार्गे वाहतूक करतात. मात्र, आता राज्यात खासगी वाहनांसाठी जिल्ह्य़ाबाहेर बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आनंदनगर आणि घोडबंदर मार्गावरील गायमुख भागात पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे. तर, बदलापूर येथील वांगणी आणि मुरबाड भागातही पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.

एसटी महामंडळ आणि महापालिकांच्या परिवहन उपक्रमाच्या बसगाडय़ांमध्येही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैध कारण असलेल्या प्रवाशांना प्रवेश दिला जाणार आहे. एसटी बसगाडय़ा गुरुवारपासून जिल्ह्य़ाबाहेर जाणार नसल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्याने दिली.

कल्याण-डोंबिवलीत गुरुवारी सकाळपासूनच अंमलबजावणी

करोनाची साखळी तोडण्यासाठी गुरुवारपासून रात्री ८ वाजेपासून कठोर निर्बंध लागू होणार असले तरी कल्याण, डोंबिवली शहरात सकाळपासूनच त्याची अंमलबजावणी होत असल्याचे चित्र होते. किरकोळ कारण घेऊन दुचाकी, चारचाकी घेऊन बाहेर पडलेल्या वाहनचालकांना ठाकुर्ली उड्डाण पूल, घरडा सर्कल, मानपाडा चौक या ठिकाणी पोलीस अडवून प्रवासाचे निश्चित कारण तपासून पुढे सोडत होते. ज्यांच्याकडे सबळ कारण नव्हते अशा वाहनचालकांना पोलीस घरी पाठवत होते.