|| ऋषीकेश मुळे

कोपरी पुलालगतच्या वृक्षछाटणीच्या परवानगीवरून सरकारी यंत्रणांत मतभेद

पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी पुलावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रुंदीकरणाच्या कामासाठी दोन्ही मार्गिकांच्या बाजूला असणाऱ्या तब्बल २०० झाडांची कत्तल करावी लागणार आहे. या वृक्षांच्या कत्तलीचा सविस्तर प्रस्ताव विकास प्राधिकरणाने ठाणे महापालिकेकडे सादर केला आहे. मात्र या वृक्षांच्या पुनरेपणाचा सविस्तर आराखडा आधी सादर करा मगच परवानगी देऊ अशी भूमिका महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने घेतली आहे. हा पुनरेपण आराखडा २० दिवसांत सादर झाला नाही तर वृक्ष कापणीस परवानगी दिली जाणार नाही, अशी भूमिका महापालिकेने घेतल्याने या मुद्दय़ावरून ही दोन्ही प्राधिकरणे आमने-सामने आली आहेत.

ठाणे शहरातून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चार मार्गिका आहेत. या मार्गावर मुंबई आणि ठाणे शहराच्या वेशीवर असलेल्या कोपरी पुलावर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोन मार्गिका आहेत. त्यामुळे या अरुंद पुलाजवळ वाहनांच्या लांब रांगा लागून वाहतूक कोंडी होत असते. त्याचा परिणाम शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवरही होतो. वाहतूक कोंडीची ही समस्या सोडविण्यासाठी कोपरी पुलाचे रुंदीकरण करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात आहे. राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जुन्या पुलाशेजारीच दोन्ही बाजूला दोन अतिरिक्त मार्गिका तयार करण्याचे काम करण्यात येणार असून त्यानंतर जुना पूल तोडून त्या ठिकाणी नवीन पुलाची उभारणी केली जाणार आहे. या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. मात्र या संपूर्ण प्रकल्पात ज्या ठिकाणाहून अतिरिक्त मार्गिका टाकण्यात येणार आहेत त्या मार्गिकेच्या दोन्ही बाजूची लहान मोठय़ा आकारचे असे एकूण २०० वृक्ष तोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ही झाडे तोडण्यासाठीची परवानगी घेण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरणाकडे अर्ज सादर करण्यात आला आहे. वृक्षप्राधिकरणाकडून यासंबंधित मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे पालनपत्रदेखील पाठवण्यात आले आहे. या पालनपत्रात नेमकी कोणती झाडे कापणार आहेत, त्यांची पुनस्र्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे यासंबंधीची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. मात्र एमएमआरडीएकडून यासंबंधीचे उत्तर अजूनही मिळालेले नाही, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. पालनपत्राचे उत्तर येण्यास उशीर झाल्यास वृक्षतोड परवानगी अर्ज रद्दबातल करता येऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले.

ठाणे महापालिका आणि वृक्ष प्राधिकरण समिती यांच्या निर्देशानुसारच आम्ही कार्यवाही करू, ज्या वृक्षांची तोड होणार आहे त्या वृक्षांच्या संख्येएवढीच आम्ही इतर ठिकाणीदेखील वृक्षांची पुनर्लागवड करू.    – दिलीप कवटकर, उपमहानगर आयुक्त, एमएमआरडीए

झाडे कापण्यासाठी परवानगीचा अर्ज आला आहे. त्या विषयीचे पालनपत्र वृक्षप्राधिकरणातर्फे प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहे. निश्चित वेळेत उत्तर आमच्यापर्यंत आले नाही तर परवानगीचा अर्ज रद्द करू.    – केदार पाटील, प्र. वरिष्ठ उद्यान अधीक्षक ठामपा