कल्याण : आपण तिघे मिळून भागीदारी पध्दतीने सुपर मार्केट सुरू करू, असे आमिष दाखवून नवी मुंबईतील ऐरोली येथील एका व्यक्तिने बदलापूर येथील एक डाॅक्टर आणि त्यांच्या मित्राकडून नऊ लाख ५० हजार रूपये वसूल केले. त्यानंतर सुपर मार्केट सुरू न करता डाॅक्टरांसह त्यांच्या मित्रांकडून घेतलेले पैसे परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. सप्टेंबर २०१९ ते जून २०२५ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक करणारी ५७ वर्षाची व्यक्ती ही नवी मुंबईतील ऐरोली भागातील एका चाळीत राहते. कल्याण पश्चिमेतील शहाड जवळील प्रेम ऑटो सर्कल भागातील एका हाॅटेलमध्ये हे पैसे देवाणघेवाणीचे व्यवहार घडले आहेत.

फसवणूक झालेले डाॅक्टर बदलापूर पूर्वतील गांधी चौक भागात राहतात. या फसवणूक प्रकरणी डाॅक्टरांनी कल्याण मधील महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फसवणूक झालेल्या डाॅक्टरांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की ऐरोलीतील एका परिचित इसमाने आपणास आणि आपल्या मित्राला भागीदारी पध्दतीने सुपर मार्केट सुरू करण्याचे आमिष दाखविले. हे सुपर मार्केट सुरू करण्यासाठी पहिले पैसे उभारावे लागतील. यासाठी तिघांनी एकत्रित पध्दतीने पैसे उभ करण्याचे ठरवले. सुपर मार्केट सुरू करण्यासाठी डाॅक्टर आणि त्यांच्या मित्राने एकूण नऊ लाख ५० हजार रूपये ऐरोलीतील सुपर मार्केट सुरू करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या इसमाच्या ताब्यात दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इसमाने डाॅक्टरांसह मित्राचा विश्वास संपादन करून हे पैसे घेतले होते. दरम्यानच्या काळात सुपर मार्केट कधी सुरू होईल असे प्रश्न डाॅक्टर आणि त्यांचा मित्र इसमाला करत होते. तो विविध कारणे देत वेळकाढूपणा करत होता. सुपर मार्केट सुरू करावयाचे नसेल तर आमचे पैसे परत कर असे दोघांनी इसमाला सांगितले. तो सुपर मार्केट सुरू करण्यावर ठाम होता. सात वर्ष झाली तरी इसम सुपर मार्केट सुरू करत नाही. म्हणून डाॅक्टरांसह मित्राला संशय आला. त्यांनी पैसे परत करण्यासाठी इसमाच्या तगादा लावला. त्यानंतर इसमाने डाॅक्टरांसह त्यांच्या मित्राला प्रतिसाद देणे बंद केले. तो डाॅक्टरांसह त्यांच्या मित्राचे सुपर मार्केट सुरू करण्यासाठी घेतलेले पैसे घेऊन पळून गेला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर बदलापूरच्या डाॅक्टरांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत हुंबे याप्रकरणाचा तपास करत आहेत.