अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरांच्या सीमेवर वसलेल्या वडवली येथील लोटस तलाव आणि अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षित जागेवर उभारलेल्या ९२ अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी पालिकेने कठोर कारवाई केली. लोकप्रतिनिधींचा दबाव झुगारत आणि पोलिस बंदोबस्तात राबवलेल्या या मोहिमेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली, तर परिसरातील बजबजपुरी कमी होऊन नागरिकांना मोकळा श्वास घेता आला.

अंबरनाथ शहरात अनधिकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांचा सुळसुळाट वाढत आहे. विशेषत: वडवली येथील निसर्गरम्य तलाव परिसर आणि पालिकेच्या उद्यान व जलतरण तलावासाठी आरक्षित भूखंडावर भूमाफियांनी आणि काही लोकप्रतिनिधींच्या पाठबळाने अनधिकृत गाळे, टपऱ्या आणि पक्की बांधकामे उभारली होती. यामुळे या परिसरात आठवडी बाजार भरू लागला आणि नागरिकांचा वावर मर्यादित झाला होता.

मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संख्ये यांनी आपल्या पथकासह गुरुवारी सकाळपासून या परिसरात धडक कारवाई राबवली. यावेळी मुख्याधिकारी स्वत: उपस्थित राहून कारवाईवर देखरेख ठेवत होते. या मोहिमेत २२ व्यावसायिक दुकाने, २० टपऱ्या आणि ५० अन्य बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईमुळे वडवली तलाव परिसर पुन्हा मोकळा आणि स्वच्छ झाला असून, नागरिकांना त्यांचे विरंगुळ्याचे ठिकाण परत मिळाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कारवाईत सातत्य राखण्याचे आव्हान

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील काही वर्षात अनेक अतिक्रमणे उभी राहिली. या अतिक्रमणांना स्थानिक राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभते. त्यामुळे या कारवाईकडे पालिकेचा कानाडोळा होतो, असा आरोप केला जातो. मात्र गुरुवारी झालेल्या कारवाईत लोकप्रतिनिधींचा आशीर्वादाने उभारलेला अनेक अतिक्रमणांवर कारवाई झाली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र या कारवाईत सातत्य रहावे अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.