व्हॅलेंटाईन डे हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणून ओळखला जातो. या दिवसासाठी प्रेमी जोडप्यांच्या तयारीला आता जोर आला आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या प्रेमदिनाला सगळ्यात वेगळी भेटवस्तू आपण आपल्या प्रियकराला देणार हा एकच विचार मनात करून तरुण मंडळी वेगवेगळी शक्कल लढवत असतात. त्यामध्ये आम्ही दोघेही कसे एकमेकांना पूरक आहोत किंवा कसे एक आहोत हे दर्शविण्यासाठी विविध प्रतिकात्मक प्रयोग करत असतात. त्याचा घेतलेला हा वेध..
खास प्रेमी युगलांसाठी टी-शर्ट
व्हॅलेंटाईन डेला आपण दोन नसून आपण एकच आहोत हे दर्शविण्यासाठी खास टी-शर्ट्सना प्राधान्य दिले जात आहे. प्रेमी जोडपी एकाच रंगाचे टी-शर्ट घालणे पसंत करू लागली आहे. त्यावर विविध प्रकारचे संदेश किंवा चित्रे असतात. त्याचबरोबर काही टी-शर्ट्सवर एकमेकांना संबोधून लिहिलेल्या काही वाक्यांचाही वापर केलेला असतो. सध्या अशाप्रकारची टी-शर्ट खास तयार करून देतात. त्यांची किंमत ४०० ते ६०० रुपये एवढी आहे.

जोडीदारासाठी खास टॅटू
सध्या टॅटूचा ट्रेंड भलताच लोकप्रिय झाला आहे. अशावेळी खास व्हॅलेंटाईन डेचे औचित्य साधून आपल्या प्रियकरासाठी खास गोंदवून घेतले जाते. त्यातही काही अशा नक्षींचा समावेश असतो, ज्याचा अर्धा भाग मुलाच्या हातावर तर अर्धा मुलीच्या. दोन्ही हात एकत्र आल्यावर ते चित्र पूर्ण होते. अशाप्रकारचे टॅटय़ू सध्या बाजारात काढून मिळतात. यामध्ये कायमस्वरूपाचे आणि तात्पुरते असे दोन प्रकार आहेत.

दोन जिवांना जोडणारे लॉकेट्स
लॉकेट्स हे पारंपरिक भेटवस्तूंपैकी एक आहे. यंदा यामध्येही खूप प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. दोन नावे एकत्र करून एक सुदंर असे पेंडंट तयार करून मिळते. या पेंडंटच्या प्रकारला सध्या बाजारात सर्वाधिक मागणी आहे. तसेच ब्रेकेबल पेंडंट्सनाही सध्या मागणी आहे. एका पेंडंटचे दोन भाग होतात व ते एकमेकांना जोडल्यावर पूर्ण होते, अशा प्रकारच्या पेंडंटनाही तरुणांकडून पसंती दिली जात आहे.