ठाणे : जिल्ह्यात गेले पंधरा दिवसांपासून शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम सुरु होती. ही मोहीम आता पूर्ण झाली असून, जिल्ह्यात ४०० हून अधिक शाळाबाह्य विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी नवी मुंबई शहरात आढळून आल्याची माहिती शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रोजगारासाठी अनेक कुटूंबे स्थलांतरित होत असतात. या कुटुंबामध्ये शाळकरी मुलांचा समावेश असतो. या वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती असते. त्यामुळे शाळाबाह्य, स्थलांतरित आणि शाळेत अनियमित असलेल्या विद्यार्थ्यांची दरवर्षी केंद्र आणि राज्यशासनाच्या सुचनेनुसार जिल्हास्तरावर शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार, यंदाच्या वर्षी ही शोध मोहीम १ जुलै ते १५ जुलै या कालावधीत राबविण्यात आली.

ठाणे जिल्ह्यातील सर्व वीटभट्ट्या, दगडखाणी, बांधकामाची ठिकाणे, रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, उपहारगृह अश्या विविध ठिकाणी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. या मोहिमेत पंधरा दिवसात जिल्ह्यात ४४८ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आली आहेत. जिल्हा शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांमध्ये मुलींपेक्षा मुलांचे प्रमाण अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. या मोहीमेत २५२ मुले तर, १९६ मुलींची संख्या आहे.

या मोहीमेत आढळून आलेल्या शाळाबाह्य विद्यार्थ्यांपैकी शाळेमध्ये कधीच दाखल झाले नसलेले, सहा महिन्यापेक्षा अधिक काळ शाळेत गेले नसलेले, ३० दिवसापेक्षा अधिक अधिक कालावधीत शाळेत गेले नसलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती ठाणे जिल्हा शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवीमुंबई शहरात सर्वाधिक तर, मुरबाड मध्ये शून्य शाळाबाह्य विद्यार्थी…

ठाणे जिल्ह्यात १ जुलै ते १५ जुलै या पंधरा दिवसाच्या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम घेण्यात आली. त्यात, जिल्ह्यात एकूण ४४८ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आली आहेत. यामध्ये नवीमुंबई शहरात सर्वाधिक म्हणजेच १५२ शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आली आहेत. तर, ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मुरबाड तालुक्यात एकही शाळाबाह्य विद्यार्थी आढळून आलेला नाही.

महापालिका आणि तालुका निहाय्य शाळाबाह्य मुलांची आकडेवारी

महापालिका/ तालुका मुले मुली एकूण
ठाणे०४ ०६ १०
नवीमुंबई८५६७१५२
भिवंडी २५३८६३
मिरा भाईंदर २८१७४५
कल्याण डोंबिवली२११४३५
उल्हासनगर ०९०८१७
भिवंडी ग्रामीण ४२२३६५
शहापूर१११०२१
कल्याण २००९२९
अंबरनाथ०७०४११
मुरबाड ००००००
एकूण२५२१९६४४८