बदलापूर : समाजमाध्यमातील एका समूहातील चर्चेला बळी पडून १३ वर्षीय मुलाने बदलापूरमधून थेट गोव्याला पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मुलाचा शोध घेण्यात बदलापूर पूर्व पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला सोमवारी यश आले आहे.

‘डिस्कॉर्ड’ या ऑनलाइन संकेतस्थळावर ‘रनअवे अ‍ॅण्ड गेट अ लाइफ’ या समूहात घरापासून पळून दूर जाण्यासाठी चर्चा होत होती. त्यातूनच त्याने घर सोडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. तसेच या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलापूर शहरातील पूर्व भागात राहणारा एक १३ वर्षीय मुलगा रविवारी ‘वर्षभराने घरी येतो’ असे सांगत घराबाहेर पडला. रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने मुलाच्या आईवडिलांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रारही दिली. मुलाचा एक मित्र त्याच्याबरोबर एका संकेतस्थळावरील चर्चा मंचावर सदस्य असल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. ‘रनअवे अ‍ॅण्ड गेट अ लाइफ’ असे या समूहाचे नाव होते. घरातून कसे पळून जावे या विषयावर या समूहात चर्चा होत होती. त्यातूनच मुलगा पळून गेला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. रविवारी या मुलाने गोवा गाठल्याचे पोलीस तपासात समोर आले. हा मुलगा गोव्याच्या कलंगुटजवळ सापडला. गोव्यावरून मंगळवारी रात्रीपर्यंत मुलाला बदलापुरात आणले जाईल. त्यानंतरच हा सर्व प्रकार कसा झाला याबाबत माहिती मिळेल, अशी माहिती बदलापूर पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.