घरात गणरायाचा पाहुणचार करायचा म्हटलं की, महिनाभर आधीपासून तयारीला सुरुवात होते. मूर्तीच्या नोंदणीपासून सजावटीच्या साहित्याच्या खरेदीपर्यंत आणि मोदकांपासून भटजींपर्यंत साऱ्या गोष्टींची सज्जता गणेशोत्सवाच्या किती तरी दिवस आधीपासून करावी लागते. मात्र, आता ही धावपळ न करता केवळ घरबसल्या गणेशाच्या आगमनाची सज्जता करणे शक्य झाले आहे. गणेशमूर्तीपासून पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यापर्यंत आणि भटजींपासून नैवेद्य तयार करणाऱ्यांपर्यंत सारेच संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

मुलुंडमधील महेश कदम या तरुणाने गणेशोत्सवानिमित्त लागणाऱ्या सर्व वस्तू एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी ‘मंगलमूर्ती डॉट ऑर्ग’ (mangalmurti.org) हे संकेतस्थळ सुरू केले असून त्या माध्यमातून भक्तांना कोणतीही धावपळ न करता गणेशोत्सवाची तयारी करता येत आहे.

पूर्वी प्रत्येक कुटुंबाचे भटजी ठरलेले असत. मात्र काळाच्या ओघात पौरोहित्य करणाऱ्यांची संख्या कमी होत गेल्याने गणेशोत्सवाच्या काळात मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी भटजींच्या वेळा मिळत नाहीत. त्यामुळे उपलब्ध असलेल्या भटजींना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी संकेतस्थळांचा वापर होऊ लागला आहे. kpandit.com, mypandit.com, gharkapandit.com यासारखी संकेतस्थळे आपल्या

गरजेनुसार भटजी मिळवून देतात. त्याचबरोबर पूजेला लागणाऱ्या विविध साहित्यांसाठी चार दुकानांमध्ये फेऱ्या मारण्यापेक्षा घरपोच साहित्य मिळवून देणारी संकेतस्थळ उपलब्ध आहेत. त्यात poojasamgri.com, mypoojbox.in, shubhkarta.com, vedicvaani.com, ही संकेतस्थळे पूजेची सामग्री पुरवू शकतात. तसेच नैवेद्याचा शिरा, मोदक असे प्रसाद तयार करणाऱ्या महिलांचे गटही आपल्या इंटरनेटवर पाहायला मिळतील. गणेशोत्सव महाराष्ट्रीयांचा सर्वात मोठा सण. काही महिने आधीच घराघरात त्याची तयारी सुरू होते. यंदा मूर्ती, सजावट, भजनी मंडळे आधीच ठरवावे लागते. आता घरबसल्या हे सारे इंटरनेटवरून ठरविता येते. Mangalmurti.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून मूर्तिकारांना एकत्र आणले जाते. प्लास्टर ऑफ पॅरिस अविघटनशील असल्याने पर्यावरणाला घातक आहे. त्यामुळे त्याऐवजी शाडूच्या मूर्ती साकाराव्यात, यासाठी मूर्तिकारांचे प्रबोधन केले जाते. mangalmurti.com या संकेतस्थळाद्वारे प्रसार केला जातो. या संकेतस्थळाच्या माध्यमातून आजवर ५०० हून अधिक मूर्तिकारांना रोजगार मिळाला असून उत्सवाच्या निमित्ताने काम करणाऱ्या प्रत्येक गटाला एकाच व्यावसपीठावर आणण्याचा प्रयत्न Mangalmurti.org या नव्या संकेतस्थळाच्या माध्यमातून करणार असल्याचे निर्माते महेश कदम म्हणाले.