लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या ऊन पावसाच्या खेळामुळे पावसाच्या धारांसह घामाच्या धाराही सुरू असल्याचे दिसते आहे. अचानक येणाऱ्या सरीमुळे गणेश दर्शनासाठी बाहेर पडलेल्या गणेशभक्तांची तारांबळ उडते आहे. तर पाऊस थांबताच घामांच्या धारा सुरू होत आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असताना पाऊसही हजेरी लावतो आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ ठाणे जिल्ह्यात सुरू आहे. दिवसाचे कमाल तापमान ३१ ते ३२अंश सेल्सिअस पर्यंत असते. तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरते आहे. त्यामुळे सायंकाळनंतर आणि पहाटे गारवा तर दिवसभरात पावसाच्या सरीनंतर तापमान उष्ण असल्याचे जाणवते आहे. सध्या ऊन पावसाच्या खेळात अचानक एक मोठी सर येते. त्यानंतर कडक ऊन पडत असल्याने पावसामुळे भिजलेल्या नागरिकांना घामाच्या धारा सुरू होतात.

आणखी वाचा-कल्याणमध्ये खेळाच्या मैदानावरील बेकायदा बांधकामावर कारवाई

सध्या गणेशोत्सवात नागरिक नातेवाईक आणि मंडळांना भेट देत असतात. अशावेळी अचानक आलेल्या पावसाच्या सरीमुळे गणेश भक्तांची तारांबळ उडते आहे. ओले झालेले गणेशभक्त पावसाच्या सरी थांबताच घामाच्या धारात असतात. याबाबत खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांना विचारले असता पावसाचे शेवटच्या टप्प्यात आणि विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात अशाच प्रकारचा पाऊस पडत असतो. पावसाची उघडझाप आणि उन्हाची हजेरी या काळात असते. त्यामुळे तापमानात वाढ झाल्याचा अनुभव येतो, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यास पावसाचा जोर वाढू शकतो. मात्र तूर्तास तशी शक्यता नाही, असेही मोडक म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाची वाटचाल सरासरीकडे

जून महिन्यात उशिराने आलेला पाऊस, जुलै महिन्यात दीडपट पडलेला पाऊस आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ५० टक्के पडलेला पाऊस असे विषम प्रमाण असताना सप्टेंबर महिन्यात मात्र ठाणे जिल्ह्यात सरासरी गाठणारा पाऊस पडतो आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात सरासरी ४०० मिलीमीटर पावसाची नोंद होत असते. सध्या ५० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. दररोज साधारणत सरासरी ३० ते ४० मिलीमीटर पावसाची नोंद होते आहे. त्यामुळे यंदाही पाऊस सरासरी गाठेल अशी आशा आहे.