डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्लीजवळील कांचनगावमध्ये एका विकासकाने कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर एका चार माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण केले आहे. या बेकायदा बांधकामप्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी पालिकेचा आरक्षित भूखंड बळकावून बेकायदा इमारतीचे बांधकाम पूर्ण करणाऱ्या विकासकांविरुध्द गुरूवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला.

चेतन माळी असे गुन्हा दाखल झालेल्या विकासकाचे नाव आहे. ही बेकायदा इमारत कांचनगावमधील शंखेश्वर व्हिला या अधिकृत इमारतीच्या समोरील भागातील आरक्षित भूखंडावर उभारण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांचा विचार करून पालिकेने या भागात उद्यानाचे आरक्षण विकास आराखड्यात प्रस्तावित केले आहे. हा भूखंड अनेक वर्ष मोकळा होता.

विकासक चेतन माळी यांनी पालिकेच्या या आरक्षित भूखंडाकडे पालिकेचे लक्ष नाही समजून गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये उद्यानाच्या आरक्षणावर बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू केले. यासंदर्भात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यानंतर बीट मुकादम शशिकांत म्हात्रे यांनी विकासक माळी यांच्या बांधकामाची पाहणी करून तसा अहवाल उपअभियंता व्ही. बी. विसपुते, अभियंता अवधूत मदत यांना दिला.

पालिकेच्या फ प्रभागाने विकासक माळी यांना नोटीस पाठवून बांधकामाची अधिकृतता सिध्द करणारी कागदपत्रे पालिकेत दाखल करण्याचे आदेश दिले. माळी यांनी कागदपत्रे नाहीच, पण याविषयीच्या सुनावणीलाही ते हजर राहिले नाहीत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये फ प्रभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी माळी यांचे बांधकाम अनधिकृत घोषित करून स्वखर्चाने १५ दिवसात तोडण्याचे आदेश दिले. तरीही त्यांनी स्वताहून बांधकाम तोडले नाही.

फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी विकासक चेतन माळी यांना पुन्हा इमारत स्वताहून तोडून घेण्याची नोटीस बजावली. त्यानंतरही विकासक बांधकाम करत असल्याचे निदर्शनास आल्याने आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर, अधीक्षक जयवंत चौधरी यांनी टिळकनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम व महापालिका अधिनियमाने विकासक माळी यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल केला. चार माळ्याची ही निर्माणाधीन बेकायदा इमारत लवकरच रंगरंगोटी करून यामधील सदनिका विकण्याची तयारी विकासकाने चालविली होती, असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. खंबाळपाडा भागात महारेरा प्रकरणातील एकूण चार बेकायदा इमारती आहेत. या इमारतींवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे.

कांचनगावमध्ये पालिकेच्या उद्यानाच्या आरक्षणावर विकासक चेतन माळी यांनी चार माळ्याच्या बेकायदा इमारतीचे बांधकाम केले आहे. त्यांच्यावर एमआरटीपीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस बंदोबस्त मिळाली की येत्या दोन ते तीन दिवसात ही इमारत आयुक्त डाॅ. जाखड यांच्या आदेशावरून भुईसपाट करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेमा मुंबरकर (साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग. डोंबिवली)