डोंबिवली: उन्हाचा कडाका वाढला आहे. भटके प्राणीही पाण्यासाठी वणवण करत आहेत. अशा परिस्थितीत बुधवारी सकाळी डोंंबिवली एमआयडीसीत एक भटका श्वान पाण्यासाठी वणवण फिरत असताना त्याला प्लास्टिकची पांढऱ्या रंगाची बरणी दिसली. बरणीत पाणी आहे, असे समजून श्वानाने त्या बरणीत तोंड घातले. पण ते बरणीत अडकले. बरणीत पाणी नव्हतेच, पण तोंड अडकल्याने श्वान अडकलेली मान सोडविण्यासाठी परिसरात अस्वस्थ होऊन उड्या मारू लागला.
अरूंद तोंड असलेल्या बरणीत श्वानाचे डोके अडकल्याने ते स्वत:हून त्याला बाहेर काढणे अशक्य झाले. श्वान बरणी अडकलेले डोके जमिनीवर बरणीसह आपटून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होता. त्याला ते जमत नव्हते. काही रहिवासी या श्वानाला पकडून त्याच्या मानेत अडकलेली बरणी काढण्याचा प्रयत्न करत होते. श्वान त्यांना भीतीने दाद देत नव्हता. एमआयडीसीतील एक सामाजिक कार्यकर्ते नंदू ठोसर यांच्या हा प्रकार निदर्शनास आला.
हेही वाचा : ठाणे जिल्ह्यातील गावोगावचे डोह आटले, पशुधनाची पाण्यासाठी भटकंती
ठोसर यांनी डोंंबिवलीतील प्लाॅन्ट ॲन्ड ॲनिमल वेल्फेअर (पाॅज) सोसायटीचे संस्थापक संचालक नीलेश भणगे यांना संपर्क केला. संचालक भणगे यांनी तातडीने आपल्या प्राणी बचाव पथकाला आवश्यक साधनांसह रुग्णवाहिकेसह एमआयडीसीत जाण्यास सांंगितले. ‘पाॅज’चे पथक एमआयडीसीत दाखल झाले. पथकातील महेश साळुंखे यांनी श्वानाला सहजगत्या पकडण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांनाही दाद देत नव्हते. बरणीत तोंड अडकल्याने श्वानाला श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ते सर्वाधिक अस्वस्थ होते.
हेही वाचा : ठाकरे यांच्या ‘मशाल चिन्हा’चे बूथ लावल्याने दोघांना मारहाण
महेश साळुंखे यांनी प्राणी पकडण्याची सुरक्षित आकडी कौशल्याने बरणी अडकलेल्या श्वानाच्या गळ्या भोवती अडकवली. त्या आकडीला दोरी होती. आकडी घट्ट बसल्यानंतर श्वान एकाच जागी स्थिरावला. यावेळी महेश यांनी श्वानाला कोणतीही इजा होणार नाही अशा पध्दतीने प्लास्टिक बरणीचा एक भाग गोलाकार पध्दतीने पातेने कापून काढला. आपली सुटका होत आहे याची चाहूल लागल्याने श्वान ही प्रक्रिया होईपर्यंत शांत होता. बरणीचा काही भाग कापून सैल केल्यानंतर महेश यांनी आपल्या एका सहकाऱ्याला हाताशी धरून बरणी हळूच श्वानाच्या मानेतून हिकसली. त्या बरोबर श्वानाची मान बरणीतून बाहेर आली. सुटकेनंतर श्वान अस्वस्थ होऊन आजुबाजुला पाहत होता.
या श्वानाची महेश साळुंखे यांंनी वैद्यकीय तपासणी करून त्याला आवश्यक उपचार करून त्याच भागात सोडून दिले. श्वानाच्या सुटकेने रहिवासांनी सुटकेचा निश्वास सोडला. नागरिकांनी आपल्या घराच्या परिसरात मोकळ्या पसरट भांड्यात प्राणी, पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी ठेवावे. अरूंद तोंड असलेल्या भांड्याचा वापर करू नये, असे आवाहन संस्थापक नीलेश भणगे यांनी केले आहे.