ठाणे : उपवन येथे टोईंग वाहन चालकाकडे परवान्याची प्रत नसल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. हे चित्रीकरण प्रसारित करणाऱ्या चेतन चिटणीस आणि रुतू टेलर या दोघांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिरसाठ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील रस्त्याच्याकडेला बेकायदा उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असल्याचे सांगत वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर पोलिस टोईंग वाहनाद्वारे कारवाई केली जाते. या कारवाईविषयी सातत्याने तक्रारी पुढे येत असतानाच उपवन येथे टोईंग वाहन चालविणाऱ्या चालकाकडेच वाहन परवाना नसल्याचा प्रकार समोर आला होता.

त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. यामध्ये चेतन चिटणीस नावाच्या व्यक्तीने टोईंग वाहन चालकाकडे वाहन परवान्याची तसेच टोईंग वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी संबंधित चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे चित्रीकरणामध्ये दिसत होते. हे चित्रीकरण सोमवारी दिवसभर ट्विटर, फेसबुक, इन्टाग्राम या समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकरणात ठाणे पोलिसांनी चिटणीस आणि टेलर या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पाच जणांना चावा, भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाने नागरिक हैराण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेतन चिटणीस आणि रुतू टेलर यांनी शासकीय कामात अडथळा आणला. तसेच टोईंग वाहनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटके मारण्याची धमकी देत चिथावणी दिली. टोईंग वाहनावरील चालकाने वाहन परवान्याची छायांकित प्रत दाखवली, असे असतानाही चिटणीस आणि टेलर यांनी टोईंग वाहनावरील वाहने सोडण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर टोईंग वाहन जाऊ दिले, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी चिटणीस आणि टेलर यांच्याविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.