ठाणे : ठाण्यातील एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि कल्याण ला जायचे असेल तर हेलिकॉप्टर मधून फिरतो. त्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आथिर्क मदत द्यावी करावी अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केली.
पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार बुधवारी शिवसेना ठाकरे गटाने राज्यव्यापी आंदोलन पुकारले आहे. त्यानुसार, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठाकरे गटाने आंदोलन आणि निदर्शने केली. “पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत मिळालीच पाहिजे”…. मंत्री तुपाशी, लाडका शेतकरी उपाशी….”पीक, जमीन गेली वाहून, सरकार गेले पळून”…. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे”…. अशा आशयाचे फलक हातात घेऊन ठाकरे यांच्या शिवसैनिकांनी राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे डोळे कधी उघडणार, शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मदत कधी करणार असा सवाल यावेळी त्यांनी उपस्थित केला. या आंदोलनास ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनानंतर राजन विचारे यांनी माध्यमांशी संवाद साधून सरकारवर टीका केली.
ठाण्यात भ्रष्टाचार
ठाणे जिल्ह्यातील भ्रष्टाचार बंद करा. अनधिकृत बांधकामांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अधिकाऱ्यांची चौकशी सुरु आहे. ठाण्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. भ्रष्टाचार बंद झाला तर शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम करु शकतो असे विचारे म्हणाले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने प्रकल्प बंद करुन शेतकऱ्यांवरील संकट दूर केले पाहिजे असेही ते म्हणाले. मराठवाड्यातील विद्यार्थी मुंबई, पुणे येथे शिकत आहेत. त्यांना शुल्क माफी द्यावी. बिहारमध्ये महिलांना १० हजार दिले जातात. पण येथे आनंदाचा शिधा बंद केला जातो अशी टीका त्यांनी सरकारवर केली. ठाणे जिल्ह्यात रस्त्यावर खड्डे, नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. एका अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले आहे. हा भ्रष्ट कारभार सुरु आहे असा आरोपही त्यांनी केला.
हेलिकऑप्टरमधून फिरतो
ठाण्यातील एक मंत्री स्वतःला शेतकरी म्हणवतो आणि कल्याण ला जायचे असेल तर हेलिकॉप्टर मधून फिरतो. त्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आथिर्क मदत द्यावी करावी अशी टीकाही राजन विचारे यांनी केली.