नवीन मार्गिका खुली झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात; कामाच्या दर्जाचा तपासणी अहवाल रखडला

ठाणे : ठाणे आणि मुंबईकरांच्या बहुप्रतीक्षेत असलेल्या कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्यातील मार्गिका तयार करण्याचे काम नवीन मार्गिका खुली झाल्यानंतरच करण्यात येणार असल्याची बाब समोर आली आहे. या पुलाच्या नवीन मार्गिकेच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित झाल्याने एमएमआरडीएने आयआयटीमार्फत तपासणी केली असून हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे. परंतु ही मार्गिका सुरू होत नाही तोपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करणे शक्य नाही. यामुळे या पुलाचे काम लांबणीवर पडल्याची चिन्हे आहेत.

ठाणे आणि मुंबई शहरातील वाहतुकीसाठी कोपरी पूल महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून सतत वाहनांची वर्दळ असते. कार, दुचाकी यांसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. या पुलाला जोडणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर दोन्ही बाजूला प्रत्येकी चारपदरी रस्ता आहे. परंतु कोपरी पुलावर दोन्ही बाजूला प्रत्येकी दोनपदरी रस्ता आहे. या चिंचोळय़ा मार्गामुळे या ठिकाणी सकाळ आणि सायंकाळी कोंडी होते. ही कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीच्या माध्यमातून कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले होते. या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून त्यामध्ये जुन्या पुलाशेजारीच दोन्ही बाजूला प्रत्येकी दोनपदरी रस्त्यांचा नवा पूल उभारण्यात आला आहे. परंतु या पुलाच्या कामाच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने एमएमआरडीएने आयआयटीमार्फत पुलाची तपासणी केली असून त्याचा अहवाल आल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे एमएमआरडीएने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील काम रखडले आहे.

दुसऱ्या टप्प्यात जुना पूल पाडून त्या जागी नवीन पूल उभारण्यात येणार आहे. या कामासाठीही विलंब लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाच दुसऱ्या टप्प्याचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांच्या दालनात खासदार राजन विचारे यांच्यासह एमएमआरडीए आणि ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक पार पडली असून या बैठकीत कोपरी पुलाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या कामाबाबत खासदार विचारे यांनी रेल्वे प्रशासनाला विचारणा केली. त्या वेळेस कोपरी पूल खुला झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील रेल्वे पुलाचे गर्डर काढून त्या ठिकाणी नवीन गर्डर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे महाव्यवस्थापक लाहोटी यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे.

रेल्वेचे स्पष्टीकरण

या पुलाचे काम नऊ महिन्यांत पूर्ण करून देण्यात येईल, असा दावाही त्यांनी केला आहे. परंतु नवीन पुलावरील मार्गिका सुरू होत नाही तोपर्यंत जुन्या पुलावरील वाहतूक बंद करून त्याचे काम करणे शक्य नाही. रेल्वेचे महाव्यवस्थापक लाहोटी यांनीही बैठकीत तसे स्पष्ट केले असून यामुळे पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील काम रखडल्याचे चित्र आहे.