डोंबिवली – नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवर लिफ्टींग स्पर्धेत डोंबिवलीतील तीन स्पर्धकांनी सुवर्ण पदकासह एकूण आठ पदके पटकावली आहेत. वर्ल्ड राॅ पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशाच्या तेरा राज्यांमधील एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. महाराष्ट्रातून ३१ स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात डोंबिवलीच्या स्पर्धकांचा समावेश होता.
ही स्पर्धा दिल्ली येथे बुरारी येथील जलसा सभागृहात पार पडली. वर्ल्ड राॅ पॉवर लिफ्टिंग फेडरेशनचे सुनील लोचब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा पार पडली. यावेळी दिल्ली बुरारी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजीव झा उपस्थित होते.
या स्पर्धेतील मास्टर दोन ७६.५ किलो वजनी गटात डोंबिवलीतील समीर जोगळेकर यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेतील आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून जोगळेकर यांनी चार सुवर्ण पदके पटकावली. उप कनिष्ठ गटात सर्वेश वंजारे यांनी ९० किलो वजनी गटात दोन सुवर्ण पदके मिळवली. कनिष्ठ १०५ किलो वजनी गटात अभिराज गिरकर यांनी एक रौप्य आणि एक कांस्य पदक पटकावले.
महिला वरिष्ठ ७५ किलो वजनी गटात दीपाली घाग यांनी क्लासिकमध्ये दोन सुवर्ण पदके पटाकवली. एक स्ट्रॉंग वूमनच्या मानकरी त्या ठरल्या. या स्पर्धेत यश मिळावे म्हणून डोंबिवलीतील स्पर्धक मागील सहा महिन्यांपासून समर्पित, मेहनत घेऊन सराव करत होते. मार्गदर्शकांकडून सल्ला घेत होते. या यशस्वी स्पर्धकांचे डोंबिवलीत आगमन झाल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे स्वागत केले.

कल्याण शहरातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. मास्टर दोन ९० किलो वजनी गटात शंकर ठाकूर यांनी तीन रौप्य आणि दोन सुवर्ण पदके पटाकवली. सीनिअर गटात कल्याणच्या गिर्जेश रजक यांनी एक रौप्य आणि तीन सुवर्ण पदके मिळवली. ठाणे कळवा येथील अर्चना गोवूळकर यांनी मास्टर दोन गटात पाच सुवर्ण पदके प्राप्त केली. मुंबईतील मुलुंड, भांडुप, कुर्ला येथील स्पर्धकांनी बाजी मारली.
सर्व यशस्वी स्पर्धकांसह महाराष्ट्रातील स्पर्धकांचे केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी भेट घेऊन स्पर्धकांनी केलेल्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. आणि अशाच प्रकारे उत्तरोत्तर यशाचे टप्पे गाठण्याचा सल्ला दिला. या स्पर्धेतून यशस्वी झालेल्या स्पर्धकांमधून रशियातील मॉस्को येथे होणार्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.