बदलापूरः कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर कल्याण ते थेट घाटापलिकडे आळेफाटापर्यंत आपातकालिन परिस्थितीत ट्रॉमा काळजी केंद्र नव्हते. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या मागणीनंतर काही वर्षांपूर्वी ग्रामीण रूग्णालयात ट्रॉमा काळजी केंद्राची उभारणी झाली. मात्र कर्मचारी नसल्याने ये केंद्र सुरू करता येत नव्हते. अखेर राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मुरबाडच्या या ट्रॉमा काळजी केंद्रासाठी १५ नव्या पदांची निर्मिती केली आहे. त्यामुळे हे केंद्र लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे जिल्ह्याला पुणे, अहमदनगर जिल्ह्याशी जोडण्यासाठी कल्याण अहमदनगर महामार्ग महत्वाचा आहे. याच महामार्गाची नुकतेच राष्ट्रीय महामार्गात दर्जोन्नती करण्यात आली आहे. त्यानुसार काही भागात रस्त्याचे कामही सुरू आहे. शेतमाल, दुध यांच्या वाहतुकीसाठी हा मार्ग महत्वाचा आहे. दररोज शेकडो मालवाहतूक ट्रक, टेम्पो येथून प्रवास करतात. प्रवासी वाहतुकही येथे मोठ्या प्रमाणावर होते. मात्र या मार्गावर अपघात झाल्यास आळेफाटा ते थेट कल्याण आणि उल्हासनगर शिवाय तात्काळ उपचाराची सुविधा नव्हती. त्यासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या मागणीनंतर मुरबाडमध्ये ट्रॉमा काळजी केंद्राला मंजुरी मिळाली होती. त्याचे काम २०१९ मध्ये पूर्ण झाले होते. तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले. मात्र त्यानंतर भाजपाची सत्ता गेल्याने या केंद्राकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत होता. उदघाटनानंतर या वास्तूमध्ये कर्मचारी, डॉक्टर यांच्याअभावी उपचार होऊ शकले नाहीत.

परिणामी ट्रॉमा काळजी केंद्र असूनही अपघात झालेल्या जखमींना कल्याणला ४० ते ५० किलोमीटरचा प्रवास करून नेण्याची वेळ येत होती. यात अनेकदा गंभीर जखमींच्या जीवाला धोका निर्माण होत होता. त्यामुळे ट्रॉमा काळजी केंद्रासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी कथोरे यांनी केली होती. त्यानुसार अखेर मुरबाडच्या या ट्रॉमा काळजी केंद्रासाठी १५ कर्मचाऱ्यांची पदे निर्माण करण्यात आली आहेत. यात एक अस्थिव्यंग शल्यचिकित्सक, २ बधिरीकरण तज्ञ, २ डॉक्टर, १ परिसेविका, २ अधिपरिचारिका अशी नियमीत आठ पदे आहेत. तर बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी १ अधिपरिचारिका, ३ कक्षसेवक, १ वाहनचालक, २ सफाई कामगार अशा सात पदांचा यात समावेश आहे. ही पदे लवकरात लवकर भरून ट्रॉमा काळजी केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्नीशल असल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.