ठाणे : ठाणे, मिरा-भाईंदर या शहरांमध्ये मेट्रो स्थानकांची नावे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता सुचविली असल्याचा आरोप करत या स्थानकांच्या नवीन नावांची यादी देऊन त्याप्रमाणे नामकरण करण्याची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. यामध्ये त्यांनी तीन हात नाका ऐवजी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्थानक असे नामकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ठाणे आणि मुंबई भागातील वाहतूकीसाठी ठाणेकरांना नवा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी ठाणे आणि मिरा-भाईंदर शहरात मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू आहे. यामध्ये वडाळा ते कासारवडवली (मेट्रो-४), दहीसर ते मिरा-भाईंदर (मेट्रो-९) आणि गायमुख ते शिवाजी चौक (मिरा-रोड, मेट्रो-१०) या मेट्रो प्रकल्पांच्या उभारणीचे काम सुरू आहे. यातील वडाळा ते कासारवडवली या मेट्रो प्रकल्पातील स्थानकांच्या उभारणीचे कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. यंदाच्या वर्षाअखेरीस हा प्रकल्प सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असतानाच, आता मेट्रो स्थानकांना कोणती नावे असावीत, याची यादी तयार करत त्याप्रमाणे स्थानकांचे नामकरण करण्याची मागणी मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली असून या संदर्भात त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठविले आहे.
ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात अनेक गावे आणि आदिवासी पाडे असून ठाणे आणि मीरा-भाइर्दर शहराच्या जडण-घडणीत, विकासात आगरी-कोळी समाजाचे फार मोठे योगदान आहे. शिवसेना पक्षाच्या वतीने सातत्याने करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे या दोन्ही शहरांमध्ये मेट्रोचे काम सुरू असून लवकरच त्याचे लोकार्पणही होणार आहे. त्यामुळे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांना, भूमिपुत्रांना विश्वासात न घेता या मेट्रो स्थानकांना नावे सुचविलेली असून त्यामध्ये एखाद्या बिल्डरने विकसित केलेल्या प्रकल्पांची नावे देखील देण्यात आलेली आहेत. वास्तविक पाहता, या दोन्ही महापालिकांच्या हद्दीतील गाव-खेड्यांचे गावपण जपण्यासाठी आणि आगरी-कोळी समाजाची संस्कृती जिवंत ठेवण्याच्या दृष्टीने मुळ गावांचा तसेच आदिवासी बांधवांनी सुचविलेल्या नावांचा विचार होणे गरजेचे आहे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. मेट्रो क्रमांक ९ च्या डोंगरी येथे वेलंकनी देवीचे पुरातन मंदिर आहे. त्यामुळे डोंगरी कारशेडला वेलंकनी माताचे नाव देण्यात यावे. तसेच मेट्रो क्रमांक ४ मोघरपाडा येथे पुरातन कापरादेव मंदिर असल्याने मोगरपाडा कारशेडला कापरादेव असे नाव देण्यात यावेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
स्थानकांच्या नावांची यादी
वडाळा ते कासारवडवली (मेट्रो-४) स्थानकांची नावे : १) गायमुख भाइर्दरपाडा २) मोघरपाडा ओवळा ३) वाघबीळ ४) कासारवडवली ५) मानपाडा ६) तत्त्वज्ञान विद्यापीठ ७) कापूरबावडी ८) माजीवडा ९) कॅडबरी जंक्शन ऐवजी ठाणे महानगरपालिका भवन १०) छत्रपती संभाजी नगर स्थानक ११) आरटीओ १२) तिन हात नाका ऐवजी धर्मवीर आनंद दिघे साहेब स्थानक
दहीसर ते मिरा-भाईंदर (मेट्रो-९) स्थानकांची नावे : १) दहिसर २) पांडुरंग वाडी ३) मीरा गाव ४) काशिगाव ५) साईबाबा नगर ६) मेडतिया नगर ऐवजी प.पू. नानासाहेब धर्माधिकारी स्थानक ७) शहीद भगतसिंग नगर उद्यान ८) नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानक
गायमुख ते शिवाजी चौक (मिरा-रोड, मेट्रो-१०) स्थानकांची नावे : १) भाइर्दर पाडा गायमुख २ ) रेतीबंदर ऐवजी हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे चौपाटी 3) चेना व्हिलेज ऐवजी चेना गाव ४) वर्सोवा ५) काशिमिरा ६) दहिसर