Thane Railway News / ठाणे : कर्जत, कसारा, बदलापूर रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या जलद रेल्वेगाडीत अनेकदा दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांना चढू किंवा उतरु दिले जात नसल्याचे अनेक प्रकार उघड झाले असताना आता या प्रवासामधील वाद विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. कर्जत रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्या दिव्यातील एका प्रवाशाला उतरण्यास अडचण आल्याने त्याने थेट बदलापूरच्या प्रवाशाला हातातील कड्याने मारून त्याला जखमी केले. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दिवा रेल्वे स्थानकात जलद रेल्वेगाड्यांना थांबा देण्यात आला. परंतु हा थांबा कर्जत, कसारा, बदलापूर भागातून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना देण्यात आल्याने दिवा रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे या रेल्वेगाड्यातील प्रवाशांसोबत वादाचे प्रसंग उद्भवतात. दिवा रेल्वे स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापर्यंत रेल्वेगाडी सोडली जावी अशी मागणी येथील प्रवाशांकडून केली जाते. या संदर्भात अनेक आंदोलने झाली. काही महिन्यांपूर्वी या मागणीसाठी महिला प्रवासी रेल्वे रुळांवर उतरल्या होत्या. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वारंवार आंदोलन होत असल्याने या समस्या केव्हा सुटणार असा प्रश्न पडला असतानाच, आता प्रवाशांमध्येच वादाचे प्रसंग घडू लागले आहेत.

बदलापूर येथे जखमी ३२ वर्षी व्यक्ती राहत असून ते नेरुळ येथे कामानिमित्ताने जात असतात. नेरुळ गाठण्यासाठी ते नेहमी ठाणे रेल्वे स्थानकातून ट्रान्स हार्बरने प्रवास करतात. मंगळवारी त्यांनी नेरुळ येथून घरी पतण्यास सुरुवात केली. नेरुळ येथून ते ठाणे रेल्वे स्थानकात आले. तेथून त्यांनी सांयकाळी ७ वाजता कर्जत रेल्वेगाडीने बदलापूरच्या दिशेने प्रवास सुरु केला. प्रवासा दरम्यान गर्दी असल्याने ते रेल्वे डब्यातील दारात उभे होते. त्याचवेळी रेल्वेगाडी दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर आली.

एक प्रवासी रेल्वेगाडीतून उतरण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु गर्दीमुळे त्याला स्थानकात उतरता येत नव्हते. संतापलेल्या त्या प्रवाशाने बदलापूरच्या प्रवाशाला हातातील कड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रवासी जखमी झाल्यानंतर दिव्याचा प्रवासी दिवा स्थानकात उतरला. तर बदलापूरचा प्रवासी बदलापूर स्थानकात उतरला. तो जखमी असल्याने त्याने पुन्हा ठाणे रेल्वे स्थानकाच्या दिशेने प्रवास सुरु केला. त्याला उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. घडलेल्या प्रकाराबाबत त्याने तक्रार दाखल केल्याने या तक्रारीच्या आधारे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम ११८ (१) या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.