तांत्रिक अडचणींकडे दुर्लक्ष करून मीटरच्या नोंदी!

वाढीव वीज देयके मिळण्याची शक्यता

electricity
संग्रहित छायाचित्र

वाढीव वीज देयके मिळण्याची शक्यता

महावितरणने अधिकाधिक ग्राहकाभिमुख व पारदर्शक होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानांचा वापर करण्याचे तंत्र अवलंबले आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा फटका ग्राहकांना बसत असल्याचा आरोप ग्राहकांकडुन केला जात आहे. यासंबंधी तक्रारींचा पाऊस महावितरणच्या कार्यालयात पडू लागला आहे. ग्राहकाभिमुख सेवा देताना या सेवेतील तांत्रिक अडथळ्यांकडे महावितरणकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या तक्रारी महावितरणला खासगी सेवा देणाऱ्या एजन्सीकडून करण्यात येत आहेत. वीज मीटरचे वाचन करण्यासाठी महावितरणने ‘मोबाइल अ‍ॅप’ प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीतील सॉफ्टवेअर व मीटर वाचन करण्यात काही तांत्रिक दोष एजन्सीचालकांना भेडसावत आहेत. त्याकडे दुर्लक्ष करून महावितरण वीजदेयकांची निर्मिती करीत असल्याने ग्राहकांना वाढीव आकाराची देयक मिळण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोप ग्राहक करत आहेत.मीटर वाचन करताना येणाऱ्या अडचणींमुळे वीजदेयकांची निर्मिती करतानाही विलंब होऊ लागल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे चालू महिन्यांची देयके अद्याप ग्राहकांना वाटप करण्यात आली नसल्याचे समजते. कल्याण परिमंडळाच्या शहरी, ग्रामीण पट्टय़ात ‘मोबाइल अ‍ॅप’ प्रणालीच्या माध्यमातून या अडचणी येण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी विजेचे मीटर वाचन (रीडिंग) करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी असायचे. महावितरणचा कारभार अधिकाधिक तंत्रज्ञानाकडे झुकू लागल्याने प्रत्यक्ष मीटर वाचनाचे कामही कमी करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये महावितरणने मीटर वाचक कमी केले आहेत. ही कामे खासगी एजन्सीना (आऊटसोर्सिग) देण्यात आली आहेत. मागील काही वर्षांपासून खासगी एजन्सी मीटर वाचन करण्याची कामे करीत आहेत.या प्रणालीमुळे खासगी एजन्सीचालकांना मीटरचे वाचन करताना अनेक अडथळे येत आहेत, अशा तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. मीटरचे वाचन योग्यरीतीने करता येत नाही. अनेक ग्राहकांच्या मीटरचे वाचन करता न आल्याने ती वीजदेयके कशी काढायची असा प्रश्न एजन्सीचालकांना पडला आहे. सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे वापर वीज युनिटपेक्षा वीजदेयकाचे आकडे फुगीर येत आहेत. महावितरणने अचानक ही मोबाइल अ‍ॅपप्रणाली विकसित केल्याने एजन्सीचालकांना तातडीने ती स्वीकारणे कठीण होत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे महावितरण आणि एजन्सीचालक यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. महावितरण एजन्सीचालकांना रेटून मोबाइल अ‍ॅपवर कामे करण्यास भाग पाडत असल्याने एजन्सीचालकांमध्ये नाराजी आहे. या सगळ्या गोंधळामुळे ग्राहकांना चालू महिन्याची वीजदेयके उशिरा मिळण्याची शक्यता एजन्सीचालकांकडून व्यक्त केली जात आहे.

महावितरणची भूमिका

ग्राहकांना अचूक वीज देयक देण्यासाठी ही प्रणाली सुरू केली आहे. ‘जीपीएस’ पध्दतीने या मीटरच्या नोंदींची माहिती घेतली जाते. त्यामुळे वाचनातील त्रुटी कमी झाल्या आहेत. सुमारे साडे चार लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. या माध्यमातून वीज मीटर नोंदणी, तक्रारी ग्राहकांना करता येऊ शकतात. एक कळ दाबली की महावितरणची सेवा ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एजन्सी चालक काही म्हणत असले तरी प्रत्यक्ष परिस्थिती तशी नाही. जसे तांत्रिक दोष निदर्शनास येत आहेत. त्याप्रमाणे ते वेळीच दुरूस्त करण्यात येत आहेत. ग्राहकांना नेहमीप्रमाणे देयक मिळतील, यासाठी महावितरण प्रयत्नशील आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाईल अ‍ॅपद्वारे मीटरचे वाचन

ग्राहकांकडील मीटर वाचनाची नोंद नोंदणी पुस्तक किंवा वहीत नोंदून घेण्याची सुरूवातीची पध्दत बंद करण्यात आली आहे. कॅमेऱ्याने मीटर वाचनाचे छायाचित्र घेऊन ते वीज देयकावर प्रसिध्द करून त्या आधारे ग्राहकांना वीज देयक देण्यात येऊ लागली आहेत. मीटर वाचनात कोणतीही हेराफेरी न करता ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या वीज युनिटचे वीज देयक देण्यात येते हे दाखविण्याचा महावितरणच्या या स्तुत्य प्रयत्नाचे ग्राहकांनी नेहमीच स्वागत केले. मीटरच्या तत्पर वाचनासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी पध्दतीची वीज मीटर महावितरणने कोटय़वधी रूपये खर्च करून खरेदी केली. ती काही ठिकाणी बसवली. त्याचा वापर सुरू केला. तत्पूर्वी इन्फ्रा रेड पध्दतीची मीटर बसविण्यात आली होती. ‘टेक्नोसॅव्ही’च्या नावाने हा खर्च सुरू असतानाच महावितरणने आता ‘मोबाईल अ‍ॅप’ प्रणाली सुरू केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Technical difficulties in msedcl