ठाणे : घोडबंदर येथील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कापूरबावडी चौक परिसरात बस गाडी आणि एक वाहन बंद पडल्याने तसेच कॅडबरी येथील उड्डाण पुलावर तीन वाहनांची एकमेकांना झालेले धडक या अपघातामुळे कॅडबरी ते कापूरबावडी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक कोंडीमुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल झाले. तर एकाच वेळी पाच वाहने रस्त्यावरून बाजूला करताना वाहतूक पोलिसांच्या ही नाकी नऊ आले होते. दुपारी एक नंतर येथे वाहतूक कोंडीमध्ये काहीसा दिलासा मिळाला असला तरीही वाहतूक कोंडी पूर्णपणे सुटली नव्हती.
घोडबंदरच्या दिशेने वाहतूक करणारी एक बस गाडी आणि एक वाहन कापुरबावडी येथील नळ पाडा परिसरात बंद पडले. त्यामुळे ठाण्याहून कापूरबावडीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कापूरबावडी चौक, उड्डाणपुल भागात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच पूर्व दृतगती महामार्गवरील कॅडबरी जंकशन जवळ उड्डाणपूलावर तीन वाहनांची एकमेकांना धडक बसली होती. हा सर्व प्रकार दुपारी 12 दरम्यान घडला. या अपघातामुळे अवजड वाहने आणि ठाण्याहून घोडबंदर, नाशिक दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांच्या एका मागून एक रांगा लागल्या होत्या. तसेच कापूरबावडीवरून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवरही वाहनांचा भार वाढल्याने कोंडी झाली होती.
या भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यातच अपघात आणि वाहने बंद पडण्याच्या कारणामुळे नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे वाहनांच्या एकामागून एक रांगा लागू लागल्या होत्या. दुपारी कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक आणि मुंबईत मुंबई ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना तसेच नाशिकच्या दिशेने आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहन चालकांना या कोंडीचा त्रास सहन करावा लागला. दुपारी एक नंतर ही येथील वाहतूक कोंडी पूर्णपणे सुरळीत झाली नव्हती. याबाबत वाहतूक पोलिसांना विचारले असता वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच कोंडी सोडवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.