कल्याण – ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, भिवंडी, नवी मुंबई शहरांमध्ये मागील २० वर्षाच्या कालावधीत घरफोड्या करणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने अटक केली आहे. त्यांच्याकडून ५४ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. चोरीचा सोन्याचा ऐवज खरेदी करणाऱ्या मिरा-भाईंदर येथील एका सोनाराला पोलिसांनी अटक केली आहे.

लक्ष्मण सुरेश शिवचरण (४७) असे सराईत चोरट्याचे नाव आहे. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील रुपाभवानी मंदिराजवळील हनुमाननगर भागातील रहिवासी आहेत. ते सध्या भिवंडीतील काल्हेर भागातील कशेळी गावात मोरया इमारतीत राहत होते. लक्ष्मण शिवचरण यांच्याकडील चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सुकेश मुदण्णा कोटीयन (५५, मूळ गाव – मंगलोर. सध्या राहणार – मिरा रोड) यांनाही पोलिसांनी अटक केली होती.

सन २००४ पासून कल्याण, डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, बदलापूर परिसरात घरफोड्या केल्याची कबुली लक्ष्मण शिवचरण यांनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडून ५३ लाख ४१ हजार रूपये किमतीचे ६६ तोळे सोने, ७९ हजार रूपये रोख रक्कम असा एकूण ५४ लाख २० हजार रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. चोरी केलेला सोन्याचा ऐवज लक्ष्मण मिरा भाईंदर येथील सोनार सुकेश कोटीयन यांना विकत होता, असे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती. सराईत चोरटा लक्ष्मण शिवचरण यांना अटक केल्याने मागील २० वर्षाच्या काळात कल्याण, डोंबिवली, ठाणे, भिवंडी परिसरात झालेल्या ५० हून अधिक घरफोड्यांचा उलगडा होणार आहे.

विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या एका गुन्ह्याचा तपास कल्याण गु्न्हे शाखेचे पथक करत होते. हा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्ही चित्रणात एक इसम चोरी करत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्याची ओळख पटवली. तो लक्ष्मण शिवचरण सराईत चोरटा असल्याचे निष्पन्न झाले. ते भिवंडी परिसरात कशेळी गाव हद्दीत राहत असल्याची माहिती मिळाल्यावर कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून लक्ष्मणला अटक केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उपायुक्त अमरसिंह जाधव, साहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित शिदे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक विनोद पाटील, हवालदार दत्ताराम भोसले, गुरुनाथ जरग, बालाजी शिंदे, ज्योत्सना कुंभारे, मीनाक्षी खेडेकर, मंगल गावित, अमोल बोरकर,आदिक जाधव, विलास कडु, अनुप कामत, दीपक महाजन, प्रवीण बागुल, उल्हास खंडारे, वसंत चौरे, सचिन वानखेडे, प्रशांत वानखेडे, गोरखनाथ पोटे, अशोक पवार, विनोद चन्ने, मिथुन राठोड, विजेंद्र नवसारे, सतीश सोनावणे यांच्या पथकाने लक्ष्मण शिवचरण यांच्या अटकेची कारवाई केली.