ठाण्यातील दुर्घटनेत दहा वर्षांची मुलगी जखमी

ठाणे : येथील राबोडी भागात रविवारी पहाटे २५ वर्षे जुन्या धोकादायक इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू, तर एक मुलगी जखमी झाली.

रमिझ शेख (३२) आणि गौस तांबोळी (४०) अशी मृतांची नावे असून फराह तांबोळी (१०) या घटनेत जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ठाणे येथील राबोडी एक भागात खत्री इमारत आहे. या इमारतीला तीन विंग आहेत. रविवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास या इमारतीच्या सी विंगमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळून तो थेट तळमजल्यावर आला. या दुर्घटनेत रमिझ, गौस आणि फराह हे तिघेही इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले. तर, दुर्घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांनी घराबाहेर धाव घेतली. या दुर्घटनेची माहिती मिळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दल, टीडीआरएफ आणि पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. या पथकांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने ढिगाऱ्याखाली अडकलेल्या रमिझ, गौस आणि फराह या तिघांना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यापैकी रमिझ आणि गौस या दोघांचा मृत्यू झाला, तर फराहवर उपचार सुरू आहेत.

पालिकेचा दावा

खत्री इमारतीची पालिकेने २०१३ मध्ये पाहणी तिला धोकादायक घोषित केले होते. तशी नोटीस पालिकेने रहिवाशांना बजावली होती. त्यानंतरही रहिवाशांनी इमारत रिकामी केली नव्हती. यामुळे राबोडी पोलिसांना ही इमारत रिकामी करून देण्यासाठी पालिकेने पत्र दिले होते. या इमारतीस ठाणे महापालिकेने पुरविलेल्या सर्व सेवा खंडित करण्याबाबत सर्व कार्यकारी अभियंत्यांना पत्र देण्यात आले होते. त्याचप्रमाणे या इमारतीच्या बांधकामाचे संरचनात्मक परीक्षण करण्याबाबत संबंधितांना पत्र देण्यात आले होते. तसेच धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये ही इमारत सी – २ – बी या वर्गवारीत असल्याचा अहवाल महापालिकेच्या तालिकेवरील संरचनात्मक परीक्षक मे.सेंटरटेक यांनी सादर केला असून, त्यामध्ये इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी असे नमूद करण्यात आले होते. त्यानंतर या इमारतीच्या रहिवाशांना तीन वेळा दुरुस्तीबाबत स्मरणपत्रे देण्यात आली होती. त्यामध्ये इमारत तातडीने रिकामी करून दुरुस्त करावी आणि तसे केले नाहीतर, काही जीवित तसेच वित्तहानी झाल्यास त्यास महापालिका जबाबदार राहणार नाही, असेही पालिकेने स्पष्ट केले होते.

दरम्यान, इमारतीची काही अंशी दुरुस्ती करण्यात आली. इमारतीचे ८५ टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर, उरलेले १५ टक्के काम तातडीने दुरुस्त करा आणि तसे केले नाहीतर काही दुर्घटना घडल्यास त्यास ठाणे महानगरपालिका जबाबदार नाही असेही पत्र मे. सेंटरटेक यांनी संबंधितांना दिलेले होते. मात्र त्यालाही योग्य प्रतिसाद मिळाला नाही. ही इमारत पूर्ण रिकामी करून काम करण्यात आले नसल्यामुळे ही दुर्घटना घडली आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

 समूह योजनेला सहकार्य करा!

राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि महापौर नरेश म्हस्के यांच्यासह नगरसेवक सुहास देसाई, साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी दुर्घटनास्थळाची पाहणी केली. अशा घटना टाळण्यासाठी क्लस्टर (समूह) योजनेला स्थानिकांनी सहकार्य करावे. तसेच क्लस्टर योजना ठाण्यात राबवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाच्यावतीन पूर्ण मदत मिळेल, असे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

रहिवाशांचे स्थलांतर

या दुर्घटनेनंतर महापालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून इमारतीच्या तिन्ही विंगमधील ७३ रहिवाशांना एका मदरशात ठेवले, तर काही रहिवासी त्यांच्या नातेवाईंकाकडे राहण्यासाठी गेले आहेत. या इमारतीमधील रहिवाशांना वारंवार सूचना देऊन तसेच इमारत धोकादायक घोषित करूनही रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.