उल्हासनगर : मुंबई, पुण्यासारख्या मोक्याच्या पदांवर ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांकडून बदलीला बगल दिली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलेला असतानाच उल्हासनगर महापालिकेतही विद्यमान लेखा विभाग प्रमुख आणि मुख्य लेखा परिक्षक त्यांच्या बदलीनंतरही ‘खुर्ची’ रिकामी करताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांच्या जागेवर नियुक्त झालेले अधिकारी १४ दिवसांपासून कारभार मिळण्याच्या प्रतिक्षेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
बदली झालेले जुने अधिकारी मुदतवाढीसाठी ‘लॉबिंग’ करत असून मंत्रालयाचे उंबरठे झिजवत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे प्रशासन प्रमुखही बदली टाळण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्या’ अधिकाऱ्यांना वेळ देत असल्याचा आरोप होतो आहे. ‘त्या’ अधिकाऱ्यांवर इतका आशिर्वाद का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या मुख्य लेखा परिक्षक आणि मुख्य लेखा अधिकारी यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी पदस्थापनेच्या प्रतिक्षेत असलेले मुख्य लेखा परिक्षक अभिजीत पिसाळ तर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज पांडे यांची बदली करण्यात आली. वित्त विभागाने १९ जून रोजी याबाबतचा आदेश जाहीर केला. त्यानुसार संबंधित बदली मिळालेल्या अधिकाऱ्यांनी आदेशाप्रमाणे उल्हासनगर महापालिका मुख्यालयात कार्यभार स्विकारण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी एका अधिकाऱ्याने विभागाचा आढावा घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र प्रशासकीय प्रमुखांनी त्यांना कार्यभार देण्यास नकार दिल्याची खात्रीलायक माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही अधिकारी बदली आदेश असतानाही अजुनही पालिकेत रूजू झालेले नाही.
यापूर्वीचे मुख्य लेखा परिक्षक आणि मुख्य लेखा अधिकारी आपल्या खुर्चीत ठाण मांडून बसलेले आहेत. आपली झालेली बदली रोखण्यासाठी आणि मुदतवाढ मिळवून घेण्यासाठी दोन्ही अधिकारी मंत्रालयाच्या फेऱ्या मारत असल्याची माहितीही समोर आली आहे. विशेष म्हणजे बदली झालेल्या अधिकाऱ्यांना सेवेत रूजू करून त्यांच्याकडून कारभार करून घेण्याची गरज असताना तसे न करता बदली रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या अधिकाऱ्यांना पालिका प्रशासनाचा आशिर्वाद मिळत असल्याने अनेक प्रश्च उपस्थित होत आहेत. त्यामुळे बदली आदेश घेऊन आलेले अधिकारी कार्यभार मिळण्याच्या प्रतिक्षेत अनेकदा कार्यालयात फेऱ्या मारताना दिसत आहेत.
पालिकेत काही महत्वाच्या प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे ते काम पूर्ण होण्यासाठी आम्ही पूर्वीच्या अधिकाऱ्यांना काही वेळ दिला आहे. कार्यभार दिला जात नाही असे म्हणणे चुकीचे आहे. बदली आदेश असले तरी अधिकारी रूजू होण्यासाठी वेळ घेतात. तो वेळ त्यांना दिला जातो आहे. येत्या शुक्रवारपर्यंत नव्या अधिकाऱ्यांना कार्यभार सोपवला जाईल. – मनिषा आव्हाळे, आयुक्त, उल्हासनगर महापालिका.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी सर्वकाही
मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या हातूनच काही कामे पूर्ण व्हावीत या हेतून बदली झालेल्या अधिकाऱ्यांना थांबवले जाते आहे. मात्र त्यामुळे पालिकेत आणि शहरात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. बदली झालेले अधिकारी सक्षम नाहीत का किंवा त्यांच्यावर प्रशासनाचा विश्वास नाही का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशिष्ट अधिकाऱ्यांवरच मेहेरबानी का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.