लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे: कमला एकादशीच्या निमिताने ठाणे शहरातील कोर्ट नाका येथील संविधान चौकामध्ये शनिवारी ‘वारी समतेची.. वारी मानवतेची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये सहभागी वारकऱ्यांकडून वारी संस्कृतीचे जिवंत देखावे, संतांचे आणि महान पुरुषांचे विचार दर्शविणारे फलक यांसारख्या विविध गोष्टी या उपक्रमातून दर्शविण्यात आल्या. अश्व रिंगण हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले होते. या कार्यक्रमात ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल वाघोले आणि मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी या प्रबोधन वारीचे आयोजन केले होते.

आणखी वाचा-समान नागरी कायद्यामुळे धर्मात-पंथात हस्तक्षेप होणार नाही, केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांचे प्रतिपादन

ठाणे शहरातील कोर्ट नाका येथील संविधान चौकामध्ये आयोजित करण्यात आलेल्या या ‘वारी समतेची वारी मानवतेची’ या उपक्रमाच्या माध्यमातून प्रबोधन वारी संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराज, साधू संत यांचे विचार याबाबत नागरिकांना प्रबोधन करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कमला एकादशीच्या निमिताने आयोजित करण्यात या उपक्रमात छत्रपती शिवाजीमहाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम या गुरूशिष्याच्या भेटीचा जीवंत देखावा चितारण्यात आला होता. संतांचे अभंग, महापुरुषांचे विचार यांचे फलक घेतलेले वारकरी यात सहभागी झाले होते.

आणखी वाचा-कल्याणमध्ये महिलेवर १५ जणांचा सशस्त्र हल्ला, तीन जण गंभीर जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आषाढी- कार्तिकी वारीत ज्या प्रमाणे अश्व रिंगण होते, त्याच पद्धतीने या ठिकाणी अश्व रिंगण करण्यात आले. आळंदी येथून आलेली संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांची पालखी देखील सहभागी झाली होती. या अश्व रिंगण सोहळ्यात सुमारे पाचशे वारकरी सहभागी झाले होते. त्यामध्ये महिला व बाल वारकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. या वारकऱ्यांनी नंतर कोर्ट नाका ते टाऊन हॉल अशी दिंडी काढली. टाऊन हॉल येथे ज्येष्ठ निरुपणकार आणि संत साहित्य अभ्यासक श्यामसुंदर सोन्नर आणि ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते यांनी प्रवचन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात ठाणे, पुणे, सोलापूर, रायगड आदी जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठाणेकरांनी या वारीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला.