जागतिक महिला दिनानिमित्त ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग यांच्या वतीने महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण  केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्य़ातील पाच तर, नवी मुंबई महापालिका हद्दीतील चार लसीकरण केंद्रांवर आज, सोमवारी फक्त महिलांचे  लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी वेगळे बुथ उभारण्यात आले आहेत. यामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या चार गटातील महिलांना लस देण्यात येईल.

ठाणे जिल्ह्य़ातील शासकीय तसेच नेमून दिलेल्या खासगी केंद्रावर लसीकरणास सुरुवात झाली आहे. मात्र, जागतिक महिला दिनाच्या दिवशी महिलांचे प्राधान्याने लसीकरण व्हावे यासाठी सोमवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयासह, कल्याण तालुक्यातील निळजे, तर, भिवंडी तालुक्यातील दिवा अंजुर, कोन आणि पडघा या प्राथमिक आरोग्य केंद्रावर तर, नवी मुंबई महापालिका हद्दीतील चार महिला लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात येणार आहे.

या केंद्रांवर महिला आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी तसेच ६० वर्षांपुढील महिलांना लस दिली जाणार असून सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत महिलांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महिलांना पूर्व नोंदणीची आवश्यकता नाही. जवळच्या केंद्रावर थेट जाऊन लस घेता येणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नवी मुंबईत महिलांसाठी चार लसीकरण केंद्रे

नवी मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज ८ मार्च या महिला दिनानिमित्त चार लसीकरण केंद्रांवर फक्त महिलाचे लसीकरण होणार आहे. त्यासाठी वाशी, नेरुळ आणि ऐरोली येथे चार महिला विशेष लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. तुभ्रे येथील पालिका शाळा क्रमांक २५, ऐरोली चिंचपाडा येथील पालिका शाळा क्र.५३, कोपरखैरणे येथील पालिका सीबीएसई  शाळा (सेक्टर ११) आणि नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र वाशीगाव, सेक्टर २ येथे महिलांसाठी लसीकरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. ती महिला दिनानंतर सर्वसाधारण होतील.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women vaccination centers in thane on the occasion of women day abn
First published on: 08-03-2021 at 00:29 IST