कल्याण- कल्याण-अहमदनगर महामार्गावरील उल्हासनगर भौगोलिक हद्दीतील म्हारळ, कांबा ते पाचवा मैल या तीन किलोमीटरच्या परिसरात मागील दोन वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्ता रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. ही कामे अतिशय संथगतीने सुरू असल्याने या कामाच्या खोदकाम, मातीचा धुरळा आणि खडखडाटामुळे प्रवासी, परिसरातील शाळा चालक हैराण आहेत.

हेही वाचा- कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन हत्या; अल्पवयीन तरुणाचे कृत्य

कल्याणहून नगर भागात जाण्यासाठी सर्वाधिक जवळचा मार्ग म्हणून मुंबई, ठाणे, रायगड भागातील वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देतात. जुन्नर भागातील भाजीपाला उत्पादक दररोज याच रस्त्याने कल्याणमध्ये येतात. कल्याण परिसरातून अनेक नोकरदार मुरबाड, किन्हवली, सरळगाव परिसरात नोकरीसाठी जातात. या सर्वांना म्हारळ ते कांबा, पाचवा मैलापर्यंत सुरू असलेल्या कामाचा फटका बसत आहे. मुरबाड ते रायतेपर्यंत महामार्गाने वाहने सुसाट येतात. एकदा रायता नदी ओलांडली की रस्त्यांच्या कामांमुळे वाहने संथगतीने धावू लागतात. सकाळ, संध्याकाळ या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असल्याने अनेक वेळा या रस्त्यावर वाहन कोंडी होते.

म्हारळ ते कांबा भागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा आहेत. या शाळेत कल्याण, डोंबिवली परिसरातून मुले शिक्षणासाठी येतात. या मुलांची वाहतूक शाळेच्या बसमधून या खडबडीत रस्त्यावरुन होते. अनेक वेळा या रस्त्यावर वाहतूक कोंडी असली की शाळेच्या बस, रुग्णवाहिका या कोंडीत अडकून पडतात. रस्ते खोदकामासाठी पोकलेन यंत्रणा वापरण्यात येते. हा भाग दगडाळ आहे. त्यामुळे खोदकाम करताना सतत खडखडाट या भागात सुरू असतो. हा आवाज परिसराला अस्वस्थ करुन सोडतो. शाळेत विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना अडचणी येतात, अशा शाळा चालकांच्या तक्रारी आहेत.

हेही वाचा- ठाणे: ठाकरे गटाला पाठिंबा देताच मुलावर आणि माझ्यावर गुन्हा दाखल; राजन राजे यांचा भाजप-शिंदे गटावर आरोप

ही कामे वेगाने पूर्ण करावीत म्हणून या भागातील अनेक रहिवासी प्रयत्नशील आहेत. त्याची दखल घेण्यात येत नाही. दुचाकी स्वार या रस्त्यावरुन जाताना धुळीने भरुन जात आहेत. कांबा, म्हारळ भागातील रहिवासी रस्ते कामामुळे दररोज घरात धुळीचे लोट घर खराब होत असल्याने हैराण आहेत. कल्याण भागातून अनेक विद्यार्थी गोवेली, शिवळे, मुरबाड भागात शिक्षणासाठी जातात. त्यांना या खराब रस्त्याचा फटका बसत आहे. ठेकेदाराने म्हारळ ते कांबा परिसरातील रस्ते कामे गतीने पूर्ण करावीत यासाठी त्यांना नोटीस देण्यात आली आहे. हे काम जलद पूर्ण व्हावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण प्रयत्नशील आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता प्रीती नाग यांनी दिली.

दोन वर्षापासून म्हारळ, कांबा पट्ट्यात संथगतीने रस्ते कामे सुरू आहेत. या कामांचा सर्वाधिक त्रास परिसरातील रहिवासी, शाळा चालक, व्यावसायिकांना होतो. दररोज घरे धुळीने भरुन जातात. प्रवासी सततच्या धुळीच्या त्रासाने आजारी पडत आहेत, अशी माहिती कांबा गावचे उपसरपंच संदीप पावशे यांनी दिली.

हेही वाचा- कल्याण-डोंबिवलीतील भूमाफियांनी शासनाचा २५०० कोटीचा महसूल बुडविला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हारळ ते कांबा भागात सुरू असलेल्या रस्ते कामाने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आणले आहे. सततच्या आवाजाने विद्यार्थ्यांना वर्गात शिकवणे अवघड होते. रस्त्यावरील खोदकामाचा धुरळा शाळेत जमा होतो. शासनाने या संथगती रस्ते कामाची दखल घ्यावी, अशी विनंती सेक्रेड हायस्कूलचे संचालक आल्वीन ॲन्थोनी यांनी केली आहे.