डोंबिवली – डोंबिवलीत गेल्या काही दिवसात तीन वेगळ्या चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी १३ लाखाचा ऐवज चोरून नेला आहे. एका घटनेत बंगल्याच्या नेपाळचा रहिवास असलेल्या सुरक्षा रक्षकाने बंगल्यात चोरी करून लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. रामनगर, विष्णुनगर, मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत राजूनगर मधील रागाई पेट्रोल पंपाजवळ कुंदन हरिश्चंद्र म्हात्रे (३१) यांचा धनश्री नावाने बंगला आहे. कुंदन यांचा गॅस एजन्सीचा व्यवसाय आहे. गेल्या शुक्रवारी कुंदन म्हात्रे आपल्या कुटुंबीयांसह लोणावळा येथे फिरण्यासाठी गेले होते. या बंगल्याच्या सुरक्षेची जबाबदारी त्यांचा सुरक्षा रक्षक सागर थापा याच्यावर सोपविण्यात आली होती. काही वर्षापासून सागर थापा कुंदन यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

हेही वाचा >>> पत्नीने मुलाला घरी राहण्यास आणले, संतापलेल्या सावत्र वडिलांकडून साडे चार वर्षीय मुलाची हत्या, पोलिसांकडूनच गुन्हा दाखल

सागर थापा हा मूळचा नेपाळचा आहे. त्याला बंगल्यातील सर्व ठिकाणांची माहिती होती. घरात मालक नाही पाहून सागरने बंगल्याचे मुख्य प्रवेशव्दार धारदार शस्त्राने उघडले. त्यानंतर बंगल्यात प्रवेश करून बंगल्याच्या तिसऱ्या माळ्यावरील रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असलेले कपाट फोडून तिजोरीतील आठ लाख दोन हजार रूपयांचा ऐवज सागरने चोरून नेल्याची तक्रार कुंदन म्हात्रे यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात केली आहे. या चोरीनंतर सागर थापा फरार झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिल शिनकर या प्रकरणाचा तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड भागात तुकारामनगरमधील लिलाधर सालियन यांच्या बंंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील दीड लाखाहून अधिक रकमेचा ऐवज चोरून नेला. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काटई-नेवाळी रस्त्यावरील अतुल दुबे यांच्या सीएनजी सिलिंडर टेस्टींंग दुकानात रात्रीच्या वेळेत प्रवेश करून चोरट्यांनी तीन लाख ६१ हजाराच्या वस्तू चोरून नेल्या आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.