केरळचे एक आमदार सध्या त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवरुन चांगलेच चर्चेत आहेत. या अनोख्या कार्डचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कार्डमुळे येणारे पाहुणे हे लग्न कधीच विसरणार नाहीत असे या आमदारांचे म्हणणे आहे. केरळमधील तनूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अब्दुर्रहमान यांनी एक शक्कल लढवली आहे. आपली मुलगी रिजवाना हिच्या लग्नासाठी त्यांनी फळं आणि भाज्यांच्या बियांपासून लग्नपत्रिका बनवली. ही पत्रिका पूर्णपणे हाताने तयार केली असून तिच्यावर पुर्नप्रक्रिया केली जाऊ शकते.

या अनोख्या संकल्पनेबाबत अब्दुर्रहमान म्हणाले, लग्नपत्रिका ही अतिशय प्रेमाने दिली जाते. पण लग्नानंतर लोक हे कार्ड रद्दीत टाकून देतात. बंगळुरुमध्ये राहणाऱ्या माझ्या एका मित्राने मला इको-फ्रेंडली लग्नपत्रिकांबाबत सांगितले. ही कल्पना मला खूप वेगळी आणि चांगली वाटली म्हणून मी त्याप्रमाणे पत्रिका बनविण्याचे ठरवले. या पत्रिकांसाठी कागद तयार करायला आणि प्रिंटींगसाठी बराच वेळ गेला. मात्र त्या मानाने कमी किंमतीत तयार झालेल्या या पत्रिकांमुळे अनेकांना रोजगार मिळाला. मात्र त्यांनी नेमक्या किती पत्रिका छापून घेतल्या हे अद्याप सांगितलेले नाही.

यामध्ये वांगी, टोमॅटो, भेंडी, झेंडू यांच्या बिया असल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रिकेवर लग्नाला येण्याचे आमंत्रण तर दिले आहे, त्याचबरोबर या पत्रिकेत असलेल्या बियांबद्दल माहिती दिली आहे. या पत्रिकेवर बिया असून ती वाचून झाल्यानंतर सूर्यप्रकाश असेल अशाठिकाणी मातीत ते टाकावे आणि रोज पाणी घालावे असे लिहीले आहे. त्यानंतर रोपटे उगविण्याची वाट बघा. यावर पाहुणे माझ्या मुलीचे लग्न कधीच विसरणार नाहीत. आणि मला खात्री आहे ते हे कार्ड फेकूनही देणार नाहीत असे या आमदारांनी सांगितले. आपल्याला या बिया लावणे शक्य नसल्यास लोक त्या आपल्या परिचितांनाही देऊ शकतात. मग भविष्यात ही झाडे वाढतील तेव्हा ते आमच्या मुलीच्या लग्नाचा नक्कीच विचार करतील.