करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून लॉकडाउन सुरु असून आता लॉकडाउनचा पाचवा टप्पा सुरु आहे. पाचव्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी सुरु करण्याला परवानगी देण्यात आली आहे. मात्र अजूनही अनेक कार्यालये सुरु झालेली नाहीत. त्यामुळेच वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. मात्र वर्क फ्रॉम होम करताना अनेकजण वेळेपेक्षा अधिक काळ काम करत असतात. वेळेपेक्षा अधिक काळ काम करण्यासाठी मग घरातील कामांसाठी ब्रेक घेतल्याचे कारण असो किंवा इंटरनेट स्लो झाल्याचे कारण असो ऑफिसपेक्षा घरी जास्त वेळ काम करावं लागतं असं अनेकांना वाटतं. बरं सध्या वर्क फ्रॉम होम सुरु आहे म्हणून पण इतर वेळेसही वर्कोहोलिक व्यक्ती ऑफिसमधील काम करण्यासाठी ड्युटीचे तास भरल्यानंतरही बराच वेळ ऑफिसमध्ये बसून असते. अशाने त्या व्यक्तीचे खासगी आणि कामकाजाच्या म्हणजेच पर्सनल आणि प्रोफेश्नल लाइफचा समतोल म्हणजे वर्क बॅलेन्स बिघडतो. याच समस्येवर काही वर्षांपूर्वी सॅमसंगने एक भन्नाट उत्तर शोधलं होतं. ते म्हणजे वर्क बॅलेन्स करणारा माऊस. या माऊसचा व्हिडिओ मागील काही आठवड्यांपासून सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झालेला पहायला मिळत आहे.

सामान्यपणे ऑफिसमध्ये काम करताना कंप्युटर वापरताना माऊस हा वापरावाच लागतो. याच माऊसचा उपयोग करुन सॅमसंगने एक भन्नाट जाहिरात बनवली होती. यासाठी बिकेआयडी कंपनीने सॅमसंग कार्ड कमर्शियलच्या जाहिरातीसाठी खास वर्क बॅलेन्स करणारा स्मार्ट कंप्युटर माऊस तयार केला होता. हा माऊस काम करणाऱ्याला खासगी आणि कार्यलयीन आयुष्यामध्ये समतोल राखण्यास मदत करतो असं जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलं होतं. कामाची वेळ झाल्यानंतर हा माऊस एखाद्या खऱ्या उंदराप्रमाणे पळून जातो आणि कुठेही लपतो. तंत्रज्ञान हे अधिक चांगल्या पद्धतीने कसे वापरता येईल यासंदर्भात एनोरेड कंपनीने ही जाहिरात तयार केली होती. सध्या याच जुन्या जाहिरातीचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

आता या माऊसची कलाकारी पाहिल्यावर तुम्हाला तो घ्यावासा नक्कीच वाटला असेल. मात्र हा माऊस सर्वसामान्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला नव्हता. कंपनीच्या एका जाहिरातीसाठी हा खास माऊस तयार करण्यात आला होता. पण खरोखरच असा माऊस असेल तर काम करणाऱ्याला त्याची मदतच होईल. तुम्हाला काय वाटते, हे कमेंट करुन नक्की कळवा.