Anuradha Tiwari Social Post: बेंगलुरूमधील एक नवउद्योजक महिला अनुराधा तिवारी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुराधा तिवारी चर्चेत आहेत. सर्वात आधी त्यांनी ‘Brahmin Genes’ अशी कॅप्शन लिहिलेली एक पोस्ट शेअर केली होती. त्यासोबत त्यांचा एक फोटोही शेअर केला होता. त्यावरून बरीच चर्चा झाल्यानंतर आता अनुराधा तिवारी यांनी आणखी एक पोस्ट केली असून त्यात त्यांचा स्वत:चा एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये “माझं नाव अनुराधा तिवारी आहे, मला ब्राह्मण असल्याचा गर्व आहे आणि मी शोषण करणारी नाही”, असं त्या म्हणत असल्याचं दिसत आहे.

नेमका प्रकार काय?

अनुराधा तिवारी यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा नारळाचं पाणी पितानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यासोबत ‘Brahmin Genes’ अशी कॅप्शन लिहिली होती. त्यावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. आरक्षणाच्या समर्थनार्थ व आरक्षणाच्या विरोधात अशा पोस्ट त्यांच्या या सोशल पोस्टवर प्रतिक्रिया म्हणून येऊ लागल्या. ही पोस्ट चर्चेत राहिल्यानंतर त्यावर अनुराधा तिवारी यांनी प्रतिक्रिया पोस्ट केली. “फक्त ब्राह्मण शब्द नमूद केल्यावर इतका वाद झाला. यातून हेच स्पष्ट होतंय की नेमकं कोण जातीवादी आहे. उच्चवर्गाला व्यवस्थेकडून काहीही मिळत नाही. ना आरक्षण, ना मोफत सुविधा. आम्ही स्वत: सगळं कमावतो. आमच्या ओळखीचा अभिमान बाळगण्याचा आम्हाला अधिकार आहे”, असं या प्रतिक्रियेच्या पोस्टमध्ये त्यांनी नमूद केलं.

अनुराधा तिवारींची नवी पोस्ट

दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून त्यात ज्यू समाजाचा उल्लेख केला आहे. “भारतात ब्राह्मण नवे ज्यू आहेत का? ब्राह्मण समाजाला शोषण करणारे म्हणून दाखवलं जाणं हे धोकादायकरीत्या सामान्य होऊ लागलं आहे. आम्ही अभिमानाने आमची ओळखही सांगू शकत नाही. हा प्रचार करणाऱ्यांना माझा संदेश आहे. मी अनुराधा तिवारी, ब्राह्मण असल्याचा मला अभिमान आहे आणि मी शोषण करणार नाही. हा द्वेष संपवा”, असं या पोस्टमध्ये अनुराधा तिवारी यांनी म्हटलं आहे. शिवाय, याच वाक्याचा पुनरुच्चार करणारा त्यांचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.

अखेर विनेश फोगटला ‘सुवर्ण पदक’ मिळालं; हरियाणाच्या खाप पंचायतीनं केलं प्रदान; विनेश म्हणाली, “माझा लढा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहेत अनुराधा तिवारी?

अनुराधा तिवारी या बेंगलुरूमधील एक नवउद्योजिका आहेत. बेंगलुरूमध्ये त्यांची JustBurstOut नावाची एजन्सी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांनी ब्राह्मण समाजाबाबत पोस्ट शेअर केल्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या पोस्टवर मोठ्या प्रमाणावर नेटिझन्स व्यक्त होत असून समर्थनार्थ व विरोधात अशा दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांच्या एक्स अकाऊंटवरील पोस्टमध्ये दिसून येत आहेत.