Daryl Mitchell Breaking Fans Iphone : आयपीएल २०२४ मधील ५३ वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रविवारी खेळवला गेला. या सामन्यात चेन्नई संघाने पंजाबचा २८ धावांनी पराभव केला. या सामन्यादरम्यान फलंदाज डॅरिल मिशेलचा एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पंजाब आणि चेन्नई यांच्यातील धर्मशाला येथे झालेल्या सामन्यापूर्वीचा आहे. सराव सत्रादरम्यान डॅरिल मिशेलच्या बॅटमधून एक चेंडू तिथे उपस्थित असलेल्या एका चाहत्याला लागला. चेंडू आदळल्याने त्या चाहत्याचा मोबाइल तुटला. यानंतर डॅरिल मिशेलने त्याला एक खास भेट दिली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक डॅरिल मिशेलच्या वागण्याचे कौतुक करत आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, डॅरिल मिशेल एका छोट्या नेटजवळ पूल शॉट्सचा सराव करत होता. काही शॉट्स नेटवर आदळले. याचवेळी अचानक मिशेलच्या बॅटमधून एक बॉल नेटवरून गेला आणि स्टेडियमवर बसलेल्या एका चाहत्याच्या आयफोनवर जाऊन आदळला. हा चाहता आयफोनने मिशेलचा व्हिडीओ बनवत होता, पण बॉल लागल्याने त्याचा मोबाइल तर फुटलाच, पण तो जखमीदेखील झाला. मिशेलच्या हे लक्षात येताच त्याने सर्वप्रथम चाहत्याची माफी मागितली, परिस्थिती समजून घेत न्यूझीलंडचा हा हुशार फलंदाज तरुणापर्यंत पोहोचला, यानंतर त्याने बॅटिंग ग्लोव्हजची जोडी त्याला भेट म्हणून दिली. मिशेलने दिलेले हे गिफ्ट पाहून चाहता खूप खूश झाला.

“रोहित शर्मा तू आता राजीनामा दे”; MI च्या स्टार खेळाडूवर सडकून टीका, युजर म्हणाला, “भावा…”

यानंतर चाहत्याने घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यावर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. या सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, मिशेलने १९ बॉल्समध्ये ३० धावांची शानदार खेळी खेळली. यादरम्यान त्याने २ चौकार आणि १ शानदार षटकार लगावले. यामुळे सीएसकेने ९ विकेट्सवर १६७ धावा केल्या होत्या. यानंतर पंजाब किंग्ज संघाला त्यांनी १३९ धावांवर रोखून सामना जिंकला, रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

यंदाच्या हंगामात मिशेलने चेन्नई सुपर किंग्जसाठी १० सामने खेळले आहेत. ज्यात त्याने १३४.७१ च्या स्ट्राइक रेटने २२९ धावा केल्या, ज्यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.