विमानतळावरील कडेकोट सुरक्षा आणि कठोर तपासणी असतानाही तस्कर छुप्या मार्गांनी अनेक गोष्टी मौल्यवान गोष्टी आणतात. आत्तापर्यंत तस्कर बॅगेज, शरीरात किंवा वेगवेगळ्या मार्गांनी सोन, ड्रग्ज, हिऱ्यांसह मौल्यवान गोष्टींची तस्करी करत असल्याचे पाहिले, पण एका तस्कराने चक्क विमानतळावरील ट्रॉली बॅगच्या मदतीने सोनं तस्करीचा प्रयत्न केला आहे. दिल्ली विमानतळावर या धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात कस्टम अधिकाऱ्यांनी एका बॅगेज ट्रॉलीच्या मागून तब्बल ५ किलोच्या सोन्याच्या साखळ्या जप्त केल्या आहेत.
यावेळी तस्करांनी कस्टम अधिकाऱ्यांना चकवा देण्यासाठी एक नवीन युक्ती अवलंबली होती. मात्र कस्टर अधिकाऱ्यांनी तस्करांच्या दोन पावलं पुढे जाऊन त्यांना रंगेहाथ पडकले आहे. विमानतळावरील सामानाची ट्रॉली कस्टमचे अधिकारी त्यांच्यासोबत आणत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
ज्यात एक बॉक्ससारखी वस्तू दिसत आहे, ती वस्तू ट्रॉलीच्या मागच्या बाजूला बसवल्याचे दिसत आहे. पण जेव्हा कस्टम अधिकाऱ्यांनी ती उघडली तेव्हा त्यांना इतके सोने सापडले की जे पाहून त्यांनाही धक्काच बसला.
मिळालेल्या माहितीनुसार, उझबेकिस्तानमधून दिल्लीला येणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे २.३ कोटी रुपयांचे सोने जप्त केले आहे. ज्याचे वजन ५ किलोपेक्षा जास्त आहे. हे बहुतांश सोनं साखळ्यांच्या रुपात होते. सुमारे ५० सोन्याच्या साखळ्या कस्टमच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. याप्रकरणी एकूण आठ जणांना अटक करण्यात आली आहे. तस्करीचा हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
एका यूजरने लिहिले की, ‘इन्फॉर्मरशिवाय त्याला पकडणे कठीण होते. पॅकिंग करताना कोणीतरी ते पाहिले असेल आणि अधिकाऱ्यांना कळवले असेल किंवा सीसीटीव्हीत दिसले असेल.’ दुसऱ्याने लिहिले, ‘इतके सोने आणणाऱ्या व्यक्तीची कुणीतरी फसवणूक केली असेल, पण आयडिया कमाल होती.
तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘यामध्ये कोणाचा तरी हात असावा. मला असे वाटते की, कदाचित कोणाच्या तरी मदतीने त्याने ही आयडिया वापरली असेल आणि कोणाच्या तरी मदतीने तो पकडला गेला असेल. चौथ्याने लिहिले की, हे लोक अधिकाऱ्यांना मूर्ख समजतात का? हे त्यांचे काम आहे. आता दुसऱ्या देशात पकडले. तो किती काळ तुरुंगात राहणार हे माहीत नाही.